आजपासून पुन्हा लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:02 AM2021-01-22T04:02:02+5:302021-01-22T04:02:02+5:30
जिल्हा रुग्णालयात ‘आयपीडी’ची तयारी औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. आता आंतररुग्ण विभाग पुन्हा ...
जिल्हा रुग्णालयात ‘आयपीडी’ची तयारी
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. आता आंतररुग्ण विभाग पुन्हा एकदा सुरू करण्याच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयात तयारी केली जात आहे. प्रत्येक वाॅर्डात खाटांचे नियोजन केले जात आहे. आवश्यक ती देखभाल-दुरुस्ती आणि स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले.
देवगिरी विशेष एक्स्प्रेस दोन दिवस रद्द
औरंगाबाद : ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकांवरील कामासाठी मध्य रेल्वेकडून लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी विशेष एक्स्प्रेस २३ आणि २४ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे; तर मुंबई ते सिकंदराबाद विशेष एक्स्प्रेस २४ आणि २५ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे. तसेच आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम विशेष एक्स्प्रेस २३ आणि २४ जानेवारी रोजी कल्याण ते मुंबईदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. आदिलाबाद ते कल्याणदरम्यान ही रेल्वे सेवा सुरू राहील.
मध्यवर्ती स्थानकामध्ये प्रवाशाला एस.टी.चा धक्का
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला बसचा धक्का लागल्याची घटना घडली. यात सदर व्यक्तीच्या पायाला जखम झाली. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. यावेळी या व्यक्तीसोबत असलेल्या नातेवाइकांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली.
जिल्हा रुग्णालयात वाढले कचऱ्याचे ढीग
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयातील पार्किंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग पडून आहेत. दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढत आहेत; तरीही ते हटविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पार्किंगमध्ये वाहन उभे करून रुग्णालयात ये-जा करताना कर्मचाऱ्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.