जगभरातील विचारवंतांनी मांडलेले महात्मा गांधी वाचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीच्या ग्रंथातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 03:43 PM2019-01-30T15:43:06+5:302019-01-30T15:50:48+5:30
हे दोन ग्रंथ गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादेतील गांधी स्मारक निधी भवनात उपलब्ध झाले आहेत.
- राम शिनगारे
औरंगाबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, त्यांच्याविषयी जगभरातील तत्त्वज्ञ, विचारवंतांनी केलेले लिखाण आणि गांधी तत्त्वज्ञानातून सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर संग्रहित दोन ग्रंथांत मिळणार आहे. नांदेड येथील लेखक जे. आर. कोकंडाकर यांनी मेहनत घेत जगभरातील व्यक्तींच्या लेखांचे संकलन आणि प्रश्नोत्तरे तयार केली. त्यास महाराष्ट्र गांधी स्मारक निधी समितीने ग्रंथ रूपात प्रकाशित केले आहे. हे दोन ग्रंथ गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादेतील गांधी स्मारक निधी भवनात उपलब्ध झाले आहेत.
महात्मा गांधी यांचा ३० जानेवारी हा स्मृती दिन. हे औचित्य साधत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे नागपूर, अमरावती आणि औरंगाबादेतील गांधी स्मारक निधीच्या उपकेंद्रांमध्ये दोन ग्रंथ उपलब्ध करून दिले आहेत. नांदेडच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादमध्ये लिपिक असलेले कोकंडाकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत गांधी विचारांच्या प्रसारासाठी कार्य सुरू केले. त्यांनी ४० ते ५० वर्षांपूर्वी जगभरातील विचारवंत, तत्त्वज्ञांनी गांधींविषयी लिहिलेल्या ५० लेखांचे संकलन केले. यात १९०८ साली दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध लेखक जोसेफ जे डोक यांनी गांधीजींवर लिहिलेल्या चरित्रात्मक लेखाचा समावेश आहे.
याशिवाय फ्रेंच लेखक रोमा रोल, सी.एफ. अॅड्र््यूज, लाईश फिशर, विनोबा भावे, मीरा बेन, मुल्कराज आनंद, सर्वपल्ली राधाकृष्णन, प्यारेलाल आदींच्या लेखांचा समावेश आहे. ६६७ पानांच्या या ग्रंथाचे नाव ‘अंडरस्टॅडिंग दी महात्मा’ असे आहे. ९१ वर्षांचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत एस. एन. सुब्बाराव यांची प्रस्तावना आहे. दुसरा ग्रंथ ‘नोइंग महात्मा गांधी क्वश्चन अॅण्ड अॅन्सर’ हा ४४७ पानांचा असून त्यात तब्बल १५०० प्रश्न व त्यांची उत्तरेही देण्यात आली आहेत. हे प्रश्न गांधीजींच्या कार्याविषयी आहेत. यातून महात्मा गांधी यांचे चरित्र, विचार, आचार याचे आकलन वाचकांना होईल, असे मत लेखक कोकंडाकर यांनी व्यक्त केले. या ग्रंथाला गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांची प्रस्तावना आहे. गांधी स्मृतिदिनानिमित्त हे ग्रंथ सवलतीच्या दरात औरंगाबादेतील गांधी स्मारक भवनात उपलब्ध असल्याची माहिती संचालक डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांनी दिली.
गांधीजींवर १३ पुस्तकांचे लिखाण
उपरोक्त दोन ग्रंथांशिवाय याशिवाय कोकंडाकर यांनी महात्मा गांधी यांच्यावर तब्बल १३ ग्रंथ लिहिले आहेत.
अभ्यास न करताच विरोध
आजच्या जगाला सावरण्यासाठी गांधी विचारच आवश्यक आहे. गांधीजींविषयी अनेक आक्षेप घेतले जातात. मात्र हे आक्षेप अज्ञानातून असतात. गांधीजींचे साहित्य वाचल्यास सगळे वादाचे मुद्दे गळून पडतील. मात्र, गांधी अभ्यास न करताच विरोध केला जातो. सत्य, अहिंसा ही तत्त्वे वगळल्यास जगात हाहाकार माजेल. यामुळेच गांधी विचार महत्त्वाचे वाटतात. त्यासाठीच कार्य करतो.
- जे. आर. कोकंडाकर, लेखक