ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे वाचनाची संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:31 PM2019-03-08T13:31:13+5:302019-03-08T13:34:28+5:30

अब्दुल कलाम यांची पुस्तके सर्वात जास्त वाचली जात आहेत. मुले साहसी पुस्तके, चरित्रे मोठ्या प्रमाणात वाचतात.

reading culture increasing in rural students | ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे वाचनाची संस्कृती

ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे वाचनाची संस्कृती

googlenewsNext

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची वाचनसंस्कृती वाढावी म्हणून वर्षभरात ५० पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिनंदनपत्र पाठविण्याचा उपक्रम केला. महाराष्ट्रातील ५५० विद्यार्थ्यांनी त्यांना वाचलेल्या ५० पुस्तकांची यादी पाठविली. या सर्व विद्यार्थ्यांना देशमुख यांनी पत्र पाठविले व त्यातील निवडक विद्यार्थ्यांचा मराठी दिनानिमित्त सत्कार केला. या उपक्रमाविषयी लक्ष्मीकांत देशमुख यांची हेरंब कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. 

प्रश्न : मुलांमधील वाचनसंस्कृती वाढावी म्हणून सतत बोलले जाते; पण तुम्ही याबाबत ठोस उपक्रम केला. हा का करावा वाटला ? 
उत्तर : साहित्य संमेलन अध्यक्ष झाल्यावर नव्या पिढीत वाचनसंस्कृती वाढावी यासाठी मी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले व करतो आहे; पण प्रत्यक्ष मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी काही करावे, असे वाटले. त्यामुळे वाचणाऱ्या मुलांना आपण पत्र लिहून कौतुक करावे यासाठी एका वर्षात ५० पुस्तके जी मुले वाचतील त्यांनी त्या पुस्तकांची यादी पाठवावी, असे आवाहन केले.

प्रश्न : प्रतिसाद कसा मिळाला? 
उत्तर : प्रतिसादाने मी थक्क झालो. राज्यातील १८ जिल्ह्यांतील ५५० विद्यार्थ्यांनी मला वाचलेल्या पुस्तकांची यादी शाळेमार्फत पाठवली. त्यात विशेष म्हणजे ग्रामीण भागातील सर्वाधिक पत्रे आली आहेत. ४० टक्के पत्रे जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची आहेत. मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांतून पत्रे आली आहेत. एकूण पत्रांत मुलींची पत्रे ७० टक्के आहेत. शहरी पत्रे कमी आहेत. ग्रामीण भागातील हे वाढते वाचनप्रेम हे खूप आश्वासक आहे. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या २५ मुला-मुलींनीही याद्या पाठवल्या आहेत. 

प्रश्न : मुले साधारणपणे काय वाचतात, असे तुमचे निरीक्षण आहे?
उत्तर : मी उत्सुकतेने त्या याद्या बघितल्या. अब्दुल कलाम यांची पुस्तके सर्वात जास्त वाचली जात आहेत. त्यानंतर सुधा मूर्ती यांची पुस्तके, साने गुरुजींची पुस्तके व फास्टर फेणे, अशी साहसी पुस्तके, चरित्रे मुले मोठ्या प्रमाणात वाचतात, असे दिसून आले. त्यांना त्या छोट्या गावात जी पुस्तके मिळतात तेच ती वाचणार हाही मुद्दा आहे. यापुढचा टप्पा म्हणून आम्ही मुलांना वाचलेल्या पुस्तकांचा परिचय लिहून पाठवा, असे आवाहन करीत आहोत व मुलांना पत्र पाठविण्याचा उपक्रम मी आता दरवर्षी राबविणार आहे. 

मुलांनी पुस्तके वाचावीत म्हणून
परिपाठ झाल्यावर रोज एका पुस्तकाची माहिती सांगावी, असे आवाहन मी शाळांना करतो आहे. यातून किमान २०० पुस्तके मुलांना माहीत होतील. मी राज्यातील सर्व विद्यापीठ कुलगुरूंना पत्रे लिहिली व प्रत्येक महाविद्यालयात वाङ्मय मंडळ स्थापन करावे, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळतो आहे. 

एक शासन निर्णय हवा...
शिक्षण विभागाने एक शासन निर्णय याबाबत प्रसिद्ध करावा यासाठीचा एक मसुदा मी शिक्षणमंत्र्यांना दिला आहे. त्यात मी परिपाठात रोज एका पुस्तकाची माहिती देणे, तालुका स्तरावर मुलांचे साहित्य संमेलन आयोजित करणे, प्रत्येक शाळेने दरवर्षी विद्यार्थी लेखनाचे पुस्तक किंवा हस्तलिखित प्रसिद्ध करणे व वाढदिवसाला मुले व शिक्षकांनी शाळेला पुस्तक भेट देणे, असे मुद्दे या प्रस्तावित शासन निर्णयात आहेत. प्रत्येक तालुक्यात पुस्तकांचे दुकान असले पाहिजे यासाठी शासकीय इमारतीत दुकान बांधून दिले पाहिजे. जिल्हा नियोजन समितीच्या बजेटमध्ये हे शक्य आहे. पूर्णवेळ ग्रंथपाल आणि शाळांना पुस्तक खरेदीसाठी अनुदान देणे या गोष्टी शासनाने करायला हव्यात.

Web Title: reading culture increasing in rural students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.