चिल्लरअभावी आठवडी बाजाराकडे पाठ

By Admin | Published: November 14, 2016 12:40 AM2016-11-14T00:40:31+5:302016-11-14T00:37:27+5:30

उस्मानाबाद : शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात मोठा शुकशुकाट दिसून आला़

Reading the Weekend of the Chillar Weekend | चिल्लरअभावी आठवडी बाजाराकडे पाठ

चिल्लरअभावी आठवडी बाजाराकडे पाठ

googlenewsNext

उस्मानाबाद : शहरातील रविवारच्या आठवडी बाजारात मोठा शुकशुकाट दिसून आला़ परिणाम होता तो केंद्र शासनाच्या हजार-पाचशे रूपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाचा! मागील चार दिवसांपासून बँकेत लागणाऱ्या लांबलचक रांगा़़ एटीएममध्ये असलेला खडखडाट आणि चिल्लरचा झालेला तुटवडा यामुळे आठवडी बाजारातील उलाढाल तब्बल ७५ टक्क्यांनी घटल्याचे व्यापारी, शेतकऱ्यांनी सांगितले़ या निर्णयाचे स्वागत होत असले तरी दैनंदिन गरजा भागविताना मात्र, तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले़
शहरात प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो़ या आठवडी बाजारात शहरासह परिसरातील शिंगोली, वडगाव, देवळाली, आळणी, खानापूर, सांजा, सारोळा, वाघोली आदी विविध गावातील नागरिक साहित्य खरेदीसाठी येतात़ मात्र, रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात मोठा शुकशुकाट दिसून आला़ ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून पाचशे-हजार रूपयांच्या नोटा रद्द झाल्या आहेत़ १०० रूपयांच्या आतील चलनावर सध्या व्यवहार सुरू आहेत़ मात्र, अनेकांकडे पाचशे-हजार रूपयांच्या नोटा असून, चिल्लरचा तुटवडा निर्माण झाल्याने बाजारातील भाजीपाला, किराणा साहित्य, कपडे खरेदी करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शहरातील आठवडी बाजारात लाखो रूपयांची उलाढाल प्रत्येक रविवारी होते़ कापड, भाजीपाला, फळे, मांस, मसाले पदार्थ आदी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी असते़ मात्र, गावातून उस्मानाबाद शहरात येईपर्यंत आणि परत घरी जाईपर्यंत या नागरिकांना ठिकठिकाणी चिल्लर अभावी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे़ चिल्लर नसल्याने अनेकांनी आठवडी बाजारात न जाणेच पसंत केले़ प्रत्येक आठवडी बाजारात, महामार्गावर असलेली गर्दी रविवारच्या आठवडी बाजारात दिसून आली नाही़ केंद्र शासनाच्या निर्णयामुळे व्यवसायावर जवळपास ७५ टक्के परिणाम झाल्याचे अनेक व्यापारी, शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Reading the Weekend of the Chillar Weekend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.