बाळांना घरी ठेवून कठोर कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस खऱ्या ‘कोरोना वॉरियर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 07:22 PM2021-06-01T19:22:48+5:302021-06-01T19:23:32+5:30
बारा बारा तास बंदोबस्तावर तैनात असलेल्या या आईंची घर संसार आणि ड्यूटी करताना खूप धावपळ होते.
- बापू सोळुंके
औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग अत्युच्च पातळीवर असताना महिला पोलिसांना ड्यूटी आणि कुटुंब सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. बाळ घरात ठेवून या महिला पोलीस कर्तव्य निभावत आहेत. अधूनमधून व्हिडिओ कॉल करून बाळांशी बोलून त्याची आणि स्वतःच्या मनाची समजूत काढावी लागते. खऱ्या अर्थाने या महिलाच कोरोना वॉरियर्स आहेत.
औरंगाबाद शहरात १५ महिन्यापासून कोरोनाची साथ आहे. प्रारंभीच्या सहा महिन्याच्या लॉकडाऊननंतर यंदा पुन्हा मार्चपासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत शहरात ५४ पॉईंटवर पोलिसांना रात्रंदिवस नाकाबंदी करावी लागते. बारा बारा तास बंदोबस्तावर तैनात असलेल्या या आईंची घर संसार आणि ड्यूटी करताना खूप धावपळ होते. आपल्यामुळे घरातील लहान मूल आणि वृद्ध आई-वडिलांना संसर्ग होणार तर नाही, याची धास्ती सतत या कोविड योद्धा महिला पोलिसांना सतावत असते; मात्र कर्तव्यापुढे सर्वकाही गौण समजून त्या अहोरात्र काम करीत असतात.
महिला पोलिसांच्या प्रतिक्रिया
शहर मोटार परिवहन शाखेत कार्यरत आहे. माझा मुलगा पाच वर्षांचा आहे. सकाळी घरातून ड्यूटीसाठी बाहेर पडल्यावर रात्री ड्यूटी समाप्त होईस्तोवर घरी जाता येत नाही. माझे पती भारतीय लष्करात आहेत. अशावेळी मुलाची आठवण आल्यावर मी त्याला फोन कॉल करते, अथवा आई-बाबांच्या फोनवर व्हिडिओ कॉल करून तो माझ्यासोबत बोलतो. त्याला काय हवे ते तो मागतो. चॉकलेट, खेळणी त्याला न्यावी लागते.
- सुजाता पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल.
माझा मुलगा १३ वर्षांचा आहे. मी जिन्सी ठाण्यात कार्यरत आहे. सीसीटीएनएसवर काम करावे लागते. कोविडमुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची परवानगी देण्याचे काम मला करावे लागते. कोविड मृत व्यक्तीचे नातेवाईक ठाण्यात येतात. त्यांच्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे मी माझ्या मुलाला आई वडिलांच्या घरी बजाजनगर येथे ठेवले आहे. दोन महिन्यांपासून त्याला भेटले नाही. व्हिडिओ कॉल करून त्यास बोलते.
- ज्योती कुंवर, महिला पोलीस कॉन्स्टेबल
मी मोटार परिवहन शाखेत वाहन चालक असल्यामुळे २४ तास अलर्ट राहावे लागते. माझा तीन वर्षांचा मुलगा अवनिशला आई वडिलांकडे ठेवून ड्यूटीला यावे लागते. त्याला दिवसभर खाण्यास लागेल एवढे तयार करून ठेवावे लागते. कामावरून घरी जाण्यास बऱ्याचदा रात्री उशीर होतो. यामुळे तो प्रतीक्षा करतो, रडतो, अशावेळी त्याला चॉकलेट, खेळणी घेऊन येते असे फोनवर सांगून त्याची समजूत काढावी लागते. कधी कधी तर तो गेटपर्यंत मागे येतो आणि मी ड्यूटीला जाऊच नये असा हट्ट करतो; मात्र कर्तव्यापुढे त्याला घरी सोडून कामावर जावेच लागते.
- वर्षा कांबळे, महिला कॉन्स्टेबल
आई पोलीस असल्याचा अभिमान
- माझी आई या पोलीस आहेत. कोरोनाची साथ चालू असताना त्यांना नाकाबंदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कामावर राहावे लागते. कामावरून ती घरी आल्यावर आमच्या घरात आनंदाचे वातावरण असते. मुलगी म्हणून मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. -जिज्ञासा पाटील.
- कोरोनामुळे आईने व्हिडिओ कॉल करून माझा वाढदिवस साजरा केला. दोन महिन्यापासून आईची आणि माझी भेट नाही. तिने येऊन मला जवळ घ्यावे असे वाटते. मात्र आम्हाला संसर्ग होऊ नये म्हणून तिला आमच्यापासून दूर राहावे लागते याची खंत वाटते. माझी आई माझ्यासाठी आदर्श आहे.
- मीत गणेश कोळी.
शहरातील एकूण पोलीस मनुष्यबळ-३३९८
महिला पोलीस कॉन्स्टेबल =४९४
पुरुष कॉन्स्टेबल - २९०४
महिला पोलीस अधिकारी -२३
पुरुष पोलीस अधिकारी - १९०