नवीन महाविद्यालयांची आता खरी सत्वपरीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:02 AM2021-05-14T04:02:11+5:302021-05-14T04:02:11+5:30

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रात ४९ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासनाने इरादापत्र दिलेल्या संस्थांपैकी ४७ महाविद्यालयांकडून अंतिम मान्यतेसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव ...

Real Satvapariksha of new colleges now! | नवीन महाविद्यालयांची आता खरी सत्वपरीक्षा !

नवीन महाविद्यालयांची आता खरी सत्वपरीक्षा !

googlenewsNext

औरंगाबाद : विद्यापीठ कार्यक्षेत्रात ४९ नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी शासनाने इरादापत्र दिलेल्या संस्थांपैकी ४७ महाविद्यालयांकडून अंतिम मान्यतेसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव आले आहेत. त्यानुसार इरादापत्रात नमूद केल्याप्रमाणे या नवीन महाविद्यालयांकडे तेवढी जागा, सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, ग्रंथालय, प्राचार्यांचा कक्ष आदी तंतोतंत अद्ययावत भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, याची पाहणी आता समित्या प्रत्यक्ष ‘स्पॉट’वर जाऊन करतील. एवढेच नाही, तर पाहणी अहवालासोबत भौतिक सुविधांचे चित्रीकरणदेखील या समित्यांना विद्यापीठ प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहे.

नवीन महाविद्यालयांच्या इरादापत्राची मुदत ३१ जानेवारी २०२२ पर्यंतची आहे. तत्पूर्वी या महाविद्यालयांना अंतिम मान्यता मिळवावी लागणार आहे. त्यासाठी शासनाकडे नवीन महाविद्यालयांच्या मान्यतेसाठी संस्थांनी दिलेल्या प्रस्तावांसोबत आवश्यक भौतिक सुविधांबाबतची माहिती शपथपत्राद्वारे दिलेली आहे. त्यानुसार आता विद्यापीठांमार्फत समित्या पाठवून त्याची खातरजमा केली जाणार आहे. विशेष म्हणजे, भौतिक सुविधांबाबत विद्यापीठाने शासनाला चुकीचा अहवाल सादर केला, तर संबंधित विद्यापीठाच्या प्रकुलगुरुंना जबाबदार धरले जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून भौतिक सुविधांची काटेकोरपणे तपासणी केली जाणार आहे.

प्रत्यक्ष पाहणीनंतर समित्यांकडून भौतिक सुविधांचा अहवाल अगोदर कुलगुरुंकडे सादर केला जाईल. कुलगुरुंच्या सूचनेनुसार अधिष्ठाता मंडळाकडून त्या अहवालांची पडताळणी होईल. नवीन महाविद्यालयांकडे काही भौतिक सुविधा अपूर्ण असतील, तर अधिष्ठाता मंडळाकडून संबंधित महाविद्यालयाच्या प्रस्तावावर तसे स्पष्टपणे नमूद केले जाईल. त्यानंतर तो अहवाल व्यवस्थापन परिषदेसमोर जाईल. व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर तो शासनाला सादर केला जाईल. अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच संबंधित महाविद्यालयांना विद्यापीठाकडे प्रथम संलग्नीकरणासाठी प्रस्ताव सादर करता येणार आहे.

चौकट.....

लॉकडाऊननंतर लगेच तपासणी

यासंदर्भात विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले की, नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठी संस्थांनी भौतिक सुविधांबाबतचा अनुपालन अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. त्यानुसार समित्यांमार्फत त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन खातरजमा केली जाईल. त्यानंतर या महाविद्यालयांच्या अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविले जातील. लॉकडाऊन उघडल्यानंतर लगेच समित्या संबंधित महाविद्यालयांच्या ठिकाणी पाठविण्यात येतील.

Web Title: Real Satvapariksha of new colleges now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.