सुरक्षा किट, संसारोपयोगी भांड्यांपासून खरे कामगार वंचित; वितरण सेंटरची आवश्यकता
By साहेबराव हिवराळे | Published: July 18, 2024 08:38 PM2024-07-18T20:38:49+5:302024-07-18T20:39:04+5:30
मजुरांनी स्वत: ऑनलाईन अर्ज भरूनही सारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मजूर, बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य तसेच संसारोपयोगी भांडी देऊन त्यांना मदत व्हावी यासाठी ‘कामगार किट’ वाटपाची योजना सरकारने आणली. परंतु, या सुरक्षा किट आणि संसारोपयोगी भांड्यांच्या किटपासून खरे नोंदणीकृत कामगार वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे.
आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि नंतर निकालाचा सोपस्कार झाला असला तरी हे किट वाटप त्या संपूर्ण प्रक्रियेत राहिले. आता आचारसंहिता संपली असूनही किट वाटप काही केल्या होत नाही. परंतु, ठराविक नेत्यांच्या विविध शिबिरात ही भांडी पोहोचवली जात असून, तेथे याचे वाटप केले जात आहे.
किट घेण्यासाठी कामगारांना आधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक असल्याचे शासनाद्वारे सांगण्यात आले. यासाठी सर्वसामान्य मजुरांनी स्वत: ऑनलाईन अर्ज भरूनही सारख्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. ९० हजार लोकांना भांड्यांचे किट वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिले नोंदणी करा आणि त्यानंतर तुमचे नाव येईल व किट वाटप करण्यात येईल. तोपर्यंत आम्हाला संपर्क साधू नका, असे कामगार कल्याण खात्याद्वारे सांगण्यात येत आहे.
अधिकारी म्हणतात, दलालाचा हस्तक्षेप नको. मजुरांनी स्वत:च ऑनलाईन अर्ज भरून त्यांच्या हक्काचे साहित्य घेऊन जावे. असे सांगत असले तरी अनेकांना फक्त चकरा मारल्याशिवाय हाती काहीच मिळत नाही. मग, मजूर वाऱ्यावर आणि विविध शिबिरांचे ट्रक गोदामावरून भरून जात आहेत.
- गौतम हिवराळे, मजूर
पैठण रोड गोडाऊनवर थांबलेल्या नागरिकांना नाना प्रकारचे प्रश्न विचारून भंडावून सोडले आहे. येथे आमचा नंबर कधी येणार हा प्रश्न आहे. किट नसल्याचे कारण सांगून प्रत्येकासाठी सूचना फलक लावण्यात येतो. परंतु अनेकांच्या डोळ्यांदेखत टेम्पो, ट्रक भरून किट कुठे जात आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.
- कृष्णा दणके (मजूर)
१ लाख ३५ हजार कामगारांची नोंदणी झालेली आहे. जवळपास ९० हजार भांड्यांचे किट वाटप करावयाच्या आहेत. त्या बहुतांश शिबिरात वाटप होत आहेत. सर्वसामान्यांना वाटपासाठी मनुष्यबळ आणि तालुकानिहाय वाटप केंद्राची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.
- शांतीलाल वर्मा (गोडाऊन इन्चार्ज, कामगार कल्याण विभाग)