एसटी, आरोग्यसेवा सामान्यांच्या जीवनाचा कणा
By Admin | Published: July 30, 2014 12:56 AM2014-07-30T00:56:29+5:302014-07-30T01:02:05+5:30
नांदेड : शासनाकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून चालविली जाणारी एस़टी़ तसेच आरोग्य सेवा ही सर्व सामान्य माणसाच्या जीवनाचा कणा आहे,
नांदेड : शासनाकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून चालविली जाणारी एस़टी़ तसेच आरोग्य सेवा ही सर्व सामान्य माणसाच्या जीवनाचा कणा आहे, असे प्रतिपादन कॉ़ ना़ रा़ जाधव यांनी केले़
एस़ टी़ कामगार संघटनेच्या प्रादेशिक कामगार मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विजयकुमार पोफळे तर सरचिटणीस हनुमंतराव ताटे, कार्याध्यक्ष संदीप शिंदे, कॉ़ प्रदीप नागापूरकर, राज्य महिला संघटक तथा विभागीय सचिव शीला नाईकवाडे, प्रादेशिक सचिव एम़ बी़ बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती़
कोणताही कामगार, कर्मचारी मर्यादीत आणि स्वत:पुरता विचार करतो़ यामुळे कामगारांचे अस्तित्व टिकणार नाही आणि प्रश्नही सुटणार नाहीत, असे जाधव यांनी सांगितले़ सार्वजनिक उपयोगाच्या उद्योगाचे सरकार खासगीकरण करू इच्छित आहे़ खासगीकरण रोखण्यासाठी कामगाराने एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले़ एसटी व कामगारांच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी प्रत्येक कामगाराने भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन कॉ़ जाधव यांनी केले़
कॉ़ प्रदीप नागापूरकर म्हणाले, नांदेडला कामगार चळचळीचा इतिहास असून येथे हा मेळावा होत असल्याचा त्यांनी आंनद व्यक्त केला़ एसटीचे खाजगीकरण कामगारांनीच रोखले़ विडी, हॉकर्स, एसटी सर्वच खासगी उद्योगातील कामगारांच्या प्रश्नासाठी कामगार एकीकरणाला बळकटीकरण देण्याचे काम करणे आवश्यक आहे, असे कॉ़नागापूरकर यांनी सांगितले़ अध्यक्षीय भाषण पोफळे यांनी केले़ (प्रतिनिधी)
प्रास्ताविकात नाईकवाडे यांनी संघटनेच्या कार्याविषयी तसेच मेळाव्याबद्दल माहिती दिली़ एम़ बी़ बोर्डे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले़
यशस्वीतेसाठी विभागीय अध्यक्ष विनोद पांचाळ, जे़ बी़ कदम, एस़ पी़ मादास, आरती ओझलवार, ए़ एस़ नातेवाड, जी़ पी़ मोगले, बी़ एऩ चव्हाण आदींनी परिश्रम घेतले़ सूत्रसंचालन दिनेश ठाकूर व सुप्रिया काकड यांनी केले़ मेळाव्यास परभणी, लातूर, बीड, जालना आदी ठिकाणचे कामगार आले होते़ (प्रतिनिधी)