जरांगे फॅक्टरचा धसका, मराठवाड्यातील आठ मतदारसंघात भाजपने आखली नव्याने रणनीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 12:37 PM2024-11-13T12:37:42+5:302024-11-13T12:39:57+5:30
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खा. भूपेंद्र यादव यांनी घेतली बैठक; त्यानंतर आठ मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात जरांगे फॅक्टरमुळे मतविभागणी होऊ नये म्हणून महायुतीतील घटक पक्षांनी एकत्रित काम करण्याची रणनीती आता भाजपने आखली आहे.मराठवाड्यातील आठ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रचारात मागे पडले असल्याने या मतदारसंघासाठी समन्वयक नेमले आहेत.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी खा. भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रसाद यांच्या उपस्थितीत विभागाचे संघटनमंत्री संजय कौडगे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्यासह अरविंद मेमन, मुरलीधरन स्वामी आदी आठ जणांची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ मतदारसंघातील बंडखोरांमुळे महायुतीचे उमेदवार अडचणीत असल्याचा अहवाल जिल्हा संघटनेकडून आल्याने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेऊन मंथन केले.
आठ मतदारसंघासाठी समन्वयक नेमण्यात आले. त्यानुसार गजानन घुगे (किनवट), खा. अशोक चव्हाण (देगलूर), केदार खटींग (हिंगोली), माजी खा. रावसाहेब दानवे (भोकरदन व बदनापूर), संजय केनेकर (फुलंब्री), माजी खा. प्रीतम मुंढे (केज), किरण पाटील (लातूर) यांच्यावर जबाबदारी दिली आहे. मतदारसंघातील सद्य:स्थितीवर हे समन्वयक लक्ष ठेवतील. पक्ष नेत्यांच्या सूचनेप्रमाणे या आठवड्यात प्रचाराचे नियोजन करून निवडणूक संपेपर्यंत समन्वयकांना मतदारसंघात थांबावे लागणार आहे.