कापसाचे १ लाख रुपये कमी देण्यात आले; चूक कळताच व्यापाऱ्याने थेट शेतकऱ्याचे घर गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 02:53 PM2023-02-23T14:53:20+5:302023-02-23T14:54:10+5:30
चुकुन कमी दिलेले पैसे व्यापाऱ्याने शेतकऱ्यास घरपोच नेऊन दिले
पिंपळदरी ( औरंगाबाद) : एका शेतकऱ्याला चुकून कापूस व्यापाऱ्याने एक लाख रुपये कमी दिले होते. पाच दिवसांनंतर ही बाब शेतकऱ्याला माहिती पडल्यानंतर त्यांनी व्यापाऱ्याला फोन केला. व्यापाऱ्याने ताळेबंद तपासल्यानंतर चूक लक्षात आली व राहिलेले पैसे घरपोच नेऊन दिले आणि दिलगिरी व्यक्त केली. पैसे मिळाल्याने शेतकऱ्याने सुटकेचा नि:स्वास सोडला.
पिंपळदरी येथील व्यापारी भाऊराव पाटील लोखंडे यांना बाळापूर येथील शेतकरी दुर्गादास निंभोरे यांनी २ लाख ९४ हजार रुपये किमतीचा कापूस दिला होता. सदरील रक्कम व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिली; परंतु शेतकऱ्याने ते पैसे न मोजता तसेच घरी नेऊन ठेवले. चार दिवसानंतर पैशांची ती गड्डी घेऊन ते बँकेत भरण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्यात १ लाख रुपये कमी असल्याचे कळाले. तातडीने त्यांनी व्यापारी भाऊराव पाटलांना फोन केला. याबाबत कळविले. भावराव पाटलांनी तात्काळ आपले ताळेबंद तपासले, तेव्हा सदरील शेतकऱ्याला रक्कम कमी दिली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सदरील राहिलेले पैसे घेऊन शेतकऱ्याचे घर गाठले व ते पैसे परत केले. तसेच नजरचुकीने घडलेल्या या घटनेबद्दल त्यांनी सदरील कुटुंबाकडे दिलगिरी व्यक्त केली.
शेतकरी व्यवहारात इमानदार असतात
शेतकरी व्यवहारात अत्यंत इमानदारीने वागतात. आमच्याकडून नजरचुकीने शेतकरी निंभोरे यांना रक्कम कमी दिली गेली. चार ते पाच दिवसांनंतर त्यांचा फोन आला. तेव्हा आम्ही ताळेबंद तपासले तेव्हा शिलकीत रक्कम असल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ ती रक्कम घरपोच नेऊन दिली.
-भाऊराव पाटील लोखंडे, व्यापारी