काय खरेच, अडीच दशकानंतर गीताला मिळणार कुटुंबाची माया ? दावा करणाऱ्या आईचे वास्तव्य औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 07:01 PM2021-03-12T19:01:46+5:302021-03-12T19:17:14+5:30
पाकिस्तानातून आणलेल्या गीताचे मूळ नाव राधा असून, मीच तिची आई असल्याचा दावा बकवालनगरातील मीना वाघमारे - पांढरे यांनी केला आहे.
वाळूज महानगर : तब्बल अडीच दशकापूर्वी जिंतूर (जि. परभणी) येथून बेपत्ता होऊन पाकिस्तानात पोहोचलेल्या मूकबधिर गीताच्या कुटुंबियांची शोधमोहीम वाळूज परिसरातील बकवालनगरात येऊन विसावा घेणार काय, याकडे आता लक्ष लागले आहे. पाकिस्तानातून आणलेल्या गीताचे मूळ नाव राधा असून, मीच तिची आई असल्याचा दावा बकवालनगरातील मीना वाघमारे - पांढरे यांनी केला आहे.
पाकिस्तानातून ४ वर्षांपूर्वी भारतात परतलेल्या मूकबधिर गीताच्या कुटुंबियांचा देशभरात शोध सुरू होता. अशातच जिंतूर येथील वाघमारे कुटुंबियांनी, बेपत्ता झालेल्या गीताचे खरे नाव राधा असून ती ४ ते ५ वर्षांची असताना बेपत्ता झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर दोन महिन्यापूर्वी गीताची परभणी व जिंतूर येथे तिची जन्मदात्री मीना वाघमारे-पांढरे हिच्याशी भेट घडवून आणली होती. या भेटीत गीता व मीना यांनी एकमेकींना ओळखल्याचा दावाही मीना वाघमारे यांनी केला आहे. यासंदर्भात लोकमत प्रतिनिधीने बुधवारी (दि. ११) वाळूजलगतच्या बकवालनगरात तिची आई मीना व सावत्र वडील दिनकर पांढरे यांची भेट घेऊन गीताच्या बेपत्ता होण्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मीना वाघमारे यांनी, आपण मूळचे जिंतूर येथील रहिवासी असून पतीचे नाव सुधाकर वाघमारे असल्याचे सांगितले.
सुधाकर वाघमारे यांच्यापासून गीता ऊर्फ राधा, पूजा व गणेश ही तीन अपत्ये झाली. राधा ही जन्मजात मूकबधिर असून तिला वाहनात बसण्याचा छंद होता. अशातच २४ वर्षांपूर्वी राधा ही ४ ते ५ वर्षाची असताना घरातून निघून गेली होती. सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. हताश होऊन आम्ही तिचा शोध घेणे बंद केले. कालांतराने सुधाकर वाघमारे यांचे निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दोन्ही अपत्यांना घेऊन मी या वाळूज एमआयडीसीत पोटाची खळगी भरण्यासाठी आले. काही दिवसांनी माझी बकवालनगरातील दिनकर पांढरे यांच्याशी ओळख झाली. मी त्यांच्यासोबत विवाह केला, असे मीना पांढरे यांनी सांगितले.
गीताच्या शरीरावरील खुणांवरून पटली ओळख
गीता पाकिस्तानातून भारतात परतल्यानंतर तिच्या कुटुंबाचा शोध सुरू होता. जिंतूरच्या नातेवाईक़ांनी तिला ओळखले. ही आपली राधा असून यासंदर्भात तिची आई मीना पांढरे यांच्याशी संपर्क साधून तिला माहिती दिली. या माहितीनंतर मीना पांढरे यांनी दोन महिन्यांपूर्वी जिंतूरला जाऊन गीता ऊर्फ राधाची भेट घेतल्यानंतर दोघींनी एकमेकींना ओळखल्याचे मीना पांढरे यांनी सांगितले. राधाच्या अंगावर असलेल्या खुणांवरून तिची ओळख पटल्याचा दावा मीना यांनी केला आहे.
शासनाने मदत केल्यास गीता ऊर्फ राधाचा सांभाळ करणार
राधाची आई मीना वाघमारे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून तिचे सावत्र वडीलही आता थकले आहेत. आजघडीला मीना पांढरे या घरासमोर भाजीपाला विक्री करून कुटुंबाला हातभार लावतात. राधाला सांभाळण्याची आपली इच्छा आहे. मात्र आर्थिक परिस्थिती खराब असल्याने तिचा सांभाळ करण्याची ऐपत नसल्याचे त्यांनी सांगितले. शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यास राधाचा सांभाळ करण्याची तयारीही मीना पांढरे यांनी दर्शविली आहे.वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनीही राधा ऊर्फ गीता हिची आई मीना व सावत्र वडील दिनकर पांढरे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.