शिवसेनेच्या पराभवाची कारणमीमांसा सेना भवनातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 06:12 PM2019-06-01T18:12:24+5:302019-06-01T18:14:50+5:30
फोनवरून संपर्क करून पराभवाच्या कारणांचा शोध
औरंगाबाद : शिवसेनेच्या स्थापनेपासून लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत मनपा विरोधी पक्षनेते, आमदार आणि खासदार, असा ३१ वर्षांचा राजकीय प्रवास करून अभेद्य बालेकिल्ल्याचे शिलेदार असलेले माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पराभव झाला. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी खैरे यांना कमी मतांनी पराभवाची धूळ चारली. शिवसेनेचे मराठवाड्यातील इतर उमेदवार निवडून आले; परंतु औरंगाबादमध्ये झालेल्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला असून, पराभवाची कारणमीमांसा थेट शिवसेना भवनातून सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे खा. जलील यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झालेले शिवसेना उमेदवार खैरे यांच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शिवसेना भवनातून काही पदाधिकाऱ्यांना फ ोनवरून विचारणा होऊ लागल्याची माहिती हाती आली आहे. काही प्रश्नांची उत्तरे संबंधित पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असून, त्याआधारे आगामी काळात विश्लेषण करून मतदारसंघाबाबत मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेचा पहिल्यांदाच जिल्ह्याच्या राजकारणात पराभव झाल्यामुळे पक्षाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. मराठवाड्यात पक्षाच्या किती जागा आल्या, यापेक्षा मराठवाड्याच्या राजधानीत पराभव झाल्यामुळे पक्षाने पराभवाच्या कारणांचा शोध सुरू केला आहे.
अपक्ष उमेदवार जाधव यांनी ‘कास्टकार्ड’च्या आधारे खैरेंविरोधात आघाडी उघडल्याचा, पक्षांतर्गत गटबाजी आणि अॅन्टी इन्कम्बंसी फॅक्टरमुळे खैरेंचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीदेखील हातचे राखून काम केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवार जाधव यांना आतून मदतीचा हात दिल्याचा आरोप सेनेतील एका गटातून होतो आहे.
असे प्रश्न विचारण्यात येत आहेत
४पक्षांतर्गत गटबाजी, पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कुणाचे काम केले, फेरबदल करण्याची गरज आहे काय? शिवसेनेचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय होते का? त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम केले की, इतर कुणाचे, मित्रपक्ष भाजपने काय काम केले. अपक्ष उमेदवारामुळे मतदान का विभागले, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबाबत तुमचे मत काय?४यासारखे काही प्रश्न पदाधिकाऱ्यांना विचारण्यात येत असल्याची माहिती समजली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असून, निवडणुकीच्या कामात जे पदाधिकारी थेट कार्यरत होते त्यांना व उर्र्वरित प्रचार यंत्रणेत असलेल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेना भवनातून संपर्क होत असल्याचे वृत्त आहे.