केंद्र शासनासह इतर प्रतिवादींना औरंगाबाद खंडपीठाची कारणेदर्शक नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:02 AM2021-03-19T04:02:12+5:302021-03-19T04:02:12+5:30
प्रतिवादीतर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल ए. एस. तल्हार यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला. याचिकेची पुढील सुनावणी २१ ...
प्रतिवादीतर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल ए. एस. तल्हार यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतला. याचिकेची पुढील सुनावणी २१ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रसायन आणि खते लि. मधील असिस्टंट ऑफिसर (मार्केटिंग) ग्रेड इ ओ, या पदाची निवडप्रक्रिया कायदेशीर आणि गुणवत्तेनुसार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.
याचिकाकर्ता राहुल चंद्रशेखर धनेधर यांनी ॲड. विष्णू ढोबळे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. वरील पदासाठीच्या नोकर भरतीप्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता पाळली जात नसून निवड आणि भरतीप्रक्रियेत आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबी टाळल्या जात आहेत. त्यामुळे गुणवत्ताधारक अर्जदार राहुल धनेधर यांच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई यांनी विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. धनेधर यांनी अर्ज दाखल केला होता. १६ ऑगस्ट २०२० रोजी त्यांची लेखी परीक्षा आणि २६ नोव्हेंबर २०२० रोजी व्यक्तिगत मुलाखत घेण्यात आली. धनेधर यांची लेखी आणि तोंडी मुलाखत उत्तम प्रकारे पार पडली. प्रतिवादी यांनी लेखी आणि तोंडी मुलाखतीची गुणवत्ता यादी ऑनलाईन किंवा कार्यालयीन नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली नाही. विनंती करूनही गुणवत्ता आणि निवडप्रक्रिया संबंधीची कागदपत्रे प्रतिवादी प्रसिद्ध करीत नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.