कोरोना संपल्यावर मेल्ट्रॉनमध्ये माफक दरात आरोग्यसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:05 AM2021-04-24T04:05:56+5:302021-04-24T04:05:56+5:30
कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी राज्य शासनाने सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून गतवर्षी मेल्ट्रॉन येथे ...
कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी राज्य शासनाने सुमारे आठ कोटी रुपये खर्च करून गतवर्षी मेल्ट्रॉन येथे हॉस्पिटल उभारले. हे हॉस्पिटल महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर ३५० रुग्णांचे कोविड केअर सेंटर याठिकाणी सुरू आहे.
दरम्यान, कोरोना संसर्ग संपल्यानंतर याठिकाणी संसर्गजन्य आजारासाठी मराठवाड्यातील एकमेव रुग्णालय सुरू करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव होता. त्यानुसार शासनासोबत पत्रव्यवहार करण्याची तयारीदेखील सुरू करण्यात आली होती. दरम्यान यासंदर्भात विचारणा केली असता पांडेय यांनी सांगितले की, कोविड केअर सेंटरसाठी सिटीस्कॅन मशीन देण्यात आले. तसेच रक्तासंबंधी चाचण्या करण्यासाठी याठिकाणी लॅब आहे. त्याचा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा म्हणून ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर नागरिकांना आरोग्य कार्ड देण्याचा महापालिकेचा विचार आहे. हे कार्ड एका वर्षासाठी असेल.
--------
एसपीव्ही स्थापन करणार
मेल्ट्रॉन हॉस्पिटलसाठी स्वतंत्र एसपीव्ही (स्पेशल पर्पज व्हेईकल) स्थापन केली जाईल. जेणेकरून इतर हस्तक्षेप कमी होतील. नागरिकांसाठी नाममात्र दरात याठिकाणी चाचण्या केल्या जातील. यासंदर्भातील अंतिम निर्णय सर्वसाधारण सभा अस्तित्वात आल्यानंतर होऊ शकतो, असे पांडेय यांनी नमूद केले.