बेरोजगारांना दिलासा ! रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्याचा खंडपीठाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 06:06 PM2020-02-04T18:06:10+5:302020-02-04T18:07:10+5:30
सुमारे ५० हजार ‘टीएआयटी’ पात्र उमेदवारांना दिलासा
औरंगाबाद : पवित्र पोर्टलमार्फत ‘ऑनलाईन’ शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भातील एका अंतरिम आदेशामुळे निकाल रखडला होता. मात्र, औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी वरील अंतरिम आदेशात दुरुस्ती करून रखडलेली भरती प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश शुक्रवारी (दि.३१) दिला.
या आदेशामुळे राज्यातील बी. एड. पदवीधारक ‘टीचर्स अॅप्टिट्यूड अँड इन्टेलीजन्स टेस्ट’ (टीएआयटी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे ५० हजार पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आदेशामुळे राज्यातील पवित्र पोर्टलमार्फत ‘आॅनलाईन’ शिक्षक भरती प्रक्रिया गतिमान होईल. नितीन कचरे या पदवीधारक याचिकाकर्त्याने बी.एड.ला प्रवेश घेतल्यानंतर ‘टीचर्स अॅप्टिट्यूड अँड इन्टेलीजन्स टेस्ट’ (टीएआयटी) दिली. वास्तविक ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार बी. एड. पदवीधारक असणे बंधनकारक असताना कचरे यांनी अपूर्ण माहितीआधारे ‘टीएआयटी’ परीक्षा दिली. त्यानंतर पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. नोंदणी नाकारल्यामुळे कचरे यांनी अॅड. शरद नातू मार्फत औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने अंतरिम आदेश देऊन कचरे यांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली.
३१ जानेवारीला झाला अंतरिम आदेश
राज्यातून सुमारे ६५ हजार उमेदवारांनी शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता. त्यातील सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक उमेदवार या परीक्षेत पात्र ठरले होते. मात्र, खंडपीठाच्या वरील अंतरिम आदेशामुळे भरती प्रक्रिया रखडली होती. ३१ जानेवारी २०२० रोजी या याचिकेवर सुनावणी झाली असता खंडपीठाने अंतरिम आदेशात दुरुस्ती केल्यामुळे भरती प्रक्रियेतील सर्वच उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील अतुल काळे तर हस्तक्षेपकाच्या वतीने अॅड. दिलीप बनकर पाटील यांनी काम पाहिले.