मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:17 PM2024-11-07T12:17:51+5:302024-11-07T12:21:41+5:30

महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित बिघडणार

Rebellion in Marathwada; Calculation of victory depends on independent votes in 18 assembly constituencies | मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित

मराठवाड्यातील बंडखोरी; १८ विधानसभा मतदारसंघात ठरणार अपक्षांच्या मतांवर विजयाचे गणित

छत्रपती संभाजीनगर : प्रमुख पक्षांकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले अनेक जण अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले आहेत. मराठवाड्यातील ४६ पैकी तब्बल १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये हेच अपक्ष उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचे गणित बिघडवू शकतात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा अपक्षांमुळे घाम निघणार आहे. त्यामध्ये वैजापूर विधानसभेत भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, कन्नडमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि फुलंब्री मतदारसंघात शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार आणि जालना लोकसभेत लक्षवेधी मते मिळवणारे सरपंच मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार म्हणून नशीब आजमावत आहेत. जालना जिल्ह्यातील जालना विधानसभेत काँग्रेसचे अब्दुल हाफिज, भाजपचे अशोक पांगारकर, परतूरमध्ये शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल आणि काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, घनसावंगी मतदारसंघात उद्धव सेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे, भाजपचे सतीश घाटगे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली.

हिंगोली मतदारसंघात काँग्रेसचे भाऊराव गोरेगावकर, भाजपचे रामदास पाटील, कळमनुरीत उद्धव सेनेचे अजित मगर यांनी बंडखोरी केली. परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभेत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची बंडखोरी कायम राहिली आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभेत भाजपचे मिलिंद देशमुख, नांदेड दक्षिणमध्ये दिलीप कंदकुर्ते, मुखेडमध्ये शिंदे सेनेचे बालाजी खतगावकर, संतोष राठोड, लोह्यात शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे, प्रा. मनोहर धोंडे यांची अपक्ष उमेदवारी कायम आहे. धाराशिव व लातूर जिल्ह्यात एकही तगडा बंडखोर उभा नसल्याचेही स्पष्ट झाले. या जिल्ह्यांमध्ये बंडखोरी केलेल्या उमेदवारांचे मन वळविण्यात महायुती व महाविकास आघाडीला यश मिळाले आहे.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक चुरस
बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर रमेश आडसकर, फुलचंद उर्फ बाबरी मुंडे आणि माधव निर्मळ या अपक्षांनी आव्हान निर्माण केले आहे. तर बीड मतदारसंघात शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, शिवसंग्रामच्या प्रमुख डॉ. ज्योती मेटे यांच्यासह इतर अपक्ष आहेत. आष्टी मतदारसंघात चार वेळा आमदार राहिलेले भीमराव धोंडे यांनी अपक्ष उमेदवार दाखल केली. गेवराईत विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी अपक्ष उमेदवारी ठेवली आहे. परळी व केज विधानसभेत मात्र महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत असल्याचे दिसून येते.

Web Title: Rebellion in Marathwada; Calculation of victory depends on independent votes in 18 assembly constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.