छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीत तीन, तर आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 11:50 AM2024-11-05T11:50:21+5:302024-11-05T11:52:51+5:30
बंडखोरांमुळे पाच मतदारसंघांत निवडणुकीचा निकाल वेगळा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात महायुतीत तीन, तर महाविकास आघाडीत दोन मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. उर्वरित मतदारसंघांत बंडखोरी शमविण्यात युती, आघाडीला यश आले. बंडखोरांमुळे पाच मतदारसंघांत निवडणुकीचा निकाल वेगळा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांतील लढतीचे चित्र ४ नोव्हेबर रोजी स्पष्ट झाले. एकूण २१४ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात आता १८३ उमेदवार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी तीन वाजता संपली. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात सर्वाधिक २९, तर सर्वांत कमी १० उमेदवार वैजापूर मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ फुलंब्री मतदारसंघात ६५ उमेदवारांपैकी ३८ जणांनी माघार घेतली. आता तिथे २७ उमेदवार राहिले आहेत. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उद्धवसेनेचे राजू वैद्य, काँग्रेसचे मधुकर देशमुख, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पांडुरंग तांगडे, पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे बाळासाहेब गायकवाड, फुलंब्रीतून भाजपचे प्रदीप पाटील, शिवसेना शिंदे गटाचे किशोर बलांडे, जगन्नाथ काळे यांनी माघार घेतली.
मतदारसंघ - माघार - अंतिम उमेदवार
सिल्लोड - ११ - २४
कन्नड - २७ - १६
फुलंब्री - ३८ - २७
औरंगाबाद मध्य - ११ - २४
औरंगाबाद पश्चिम - १० - १८
औरंगाबाद पूर्व - ४० - २९
पैठण - ३४ - १७
गंगापूर - २७ - १८
वैजापूर - १६ - १०
--------------
एकूण - २१४ - १८३
बंडखोरी कायम असलेले मतदारसंघ
▪️ मतदारसंघाचे नाव - औरंगाबाद पूर्व
▪️ बंडखोरी कायम - डॉ. गफ्फार कादरी (स.पा.कडून बंडखोरी)
▪️ मतदारसंघाचे नाव - औरंगाबाद मध्य
▪️ बंडखोरी कायम - बंडू ओक (उद्धवसेनेचे कार्यकर्ते)
▪️ मतदारसंघाचे नाव - फुलंब्री
▪️ बंडखोरी कायम- रमेश पवार (जिल्हाप्रमुख, शिंदेसेना )
▪️ मतदारसंघाचे नाव- गंगापूर
▪️ बंडखोरी कायम - प्रा. डॉ. सुरेश सोनवणे (भाजपचे पदाधिकारी)
▪️ मतदारसंघाचे नाव- वैजापूर
▪️ बंडखोरी कायम- एकनाथ जाधव (भाजप कार्यकर्ते)