फुलंब्रीत शिंदेसेनेच्या जिल्हाध्यक्षांची बंडखोरी कायम, महायुती-महाविकास आघाडीस आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 05:56 PM2024-11-04T17:56:00+5:302024-11-04T17:58:32+5:30
विशेष म्हणजे, लोकसभेला दीडलाख मत घेणारे साबळेही मैदानात आहेत
फुलंब्री : फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आज ६५ पैकी एकूण ३८ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांची बंडखोरी कायम आहे. विशेष म्हणजे, मनोज जरांगे समर्थक सर्व १५ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारासोबत आता एकूण २७ उमेदवारांमध्ये लढत होईल. मात्र, पवार रिंगणात असल्याने महायुतीच्या उमेदवाराची धावपळ उडण्याची शक्यता आहे.
फुलंब्री मतदार संघात आता महाविकास आघाडीचे उमेदवार विलास औताडे, महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार या तीन प्रमुख उमेदवारासह एकूण २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात लोकसभा निवडणुकीत दीड लाख मतदान मिळवलेले मंगेश साबळे देखील मैदानात आहेत. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडी आणि महायुती यांना दिलासा मिळाला. पण शिंदेसेना बंडखोर रमेश पवार यांच्या उमेदवारीमुळे महायुतीला अडचणी येण्याची शक्यता आहे.
जरांगे समर्थक १५ उमेदवारांच्या हाती निराशा
मतदार संघात मनोज जरांगे पाटील जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या मागे राहून त्यांना निवडून आणायचे कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाणार नाही, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेणाऱ्या १५ उमेदवारांच्या हाती निराशा आली. जरांगे यांच्या निर्णयानंतर सर्वांनी माघार घेतली. यात किशोर बलांडे यांचा देखील समावेश आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बलांडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मागील दोन वर्षापासून त्यांनी मतदारसंघ पिजून काढला होता. पण जरांगे पाटील यांच्या निर्णयाने त्यांचा हिरमोड झाला.
दोनवेळा भाजपा, दोनदा भाजपा
फुलंब्री मतदार संघात मागील ४ निवडणुकीत दोनवेळा कॉंग्रेस तर दोन वेळा भाजपाचे उमेदवार निवडून आलेले आहे. आता या निवडणुकीत महायुती मधील घटक पक्षाचे बंडखोर उमेदवार कोणाच्या फायद्यात तर कोणाला तोटा करतात हे समजून येईल.