बँक खात्यावर जमा झालेले अनुदान मिळेना !
By Admin | Published: February 22, 2016 12:37 AM2016-02-22T00:37:36+5:302016-02-22T00:40:03+5:30
लातूर : २ लाख ५८ हजार १२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०८ कोटी ९१ लाख ७७ हजार रुपयांची रक्कम जमा केली असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असले,
लातूर : २ लाख ५८ हजार १२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर २०८ कोटी ९१ लाख ७७ हजार रुपयांची रक्कम जमा केली असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असले, तरी वास्तवात अनेक शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप झाले नाही. बँकेत खेटे मारल्यानंतर अनुदान जमा झाले नसल्याचे बँकांकडून सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शासनाने २१० कोटी दुष्काळी अनुदान दिले आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह याद्या अद्ययावत करून अनुदान जमा केल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. तालुकानिहाय अनुदान बँकेत जमा केले आहे. मात्र अनेक गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. दररोज बँकांत चकरा मारूनही अनुदान जमा झाले नसल्याचेच उत्तर बँक अधिकाऱ्यांकडूनशेतकऱ्यांना दिले जात आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. लातूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ आहे. खरीपाबरोबर रबी पिकेही गेले आहेत. पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असल्यामुळे २१० कोटींचे अनुदान मिळाले. ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केल्याचे सांगण्यात येत असले, तरी औसा तालुक्यातील भादा, भेटा, लातूर तालुक्यातील गंगापूर, भोईसमुद्रगा, जोडजवळा, रेणापूर तालुक्यातीलखरोळा, सेलू जवळगा अशा अनेक गावांतील शेतकऱ्यांनी आम्हाला अनुदान वाटप झाले नसल्याचे सांगितले आहे. दररोज बँकांत जाऊन बँक अधिकाऱ्यांकडून अनुदान जमा झाले नसल्याचेच सांगण्यात येत असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. (प्रतिनिधी)