बीड बायपाससाठी चार निविदा प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 01:50 PM2019-10-12T13:50:41+5:302019-10-12T14:00:20+5:30
विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.
औरंगाबाद : बीड बायपासचे काम ३८३ कोटी रुपयांतून करण्यात येणार आहे. यात रुंदीकरणासह उड्डाणपुलांच्या कामांचा समावेश आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मागविलेल्या निविदांना चार परप्रांतीय कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला आहे. विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर निश्चित केलेल्या कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.
औरंगाबाद-अजिंठा रस्त्याचे काम आंध्र प्रदेशातील ऋत्विक एजन्सीने घेतले होते. तो कंत्राटदार अवसायनात निघाल्यामुळे त्याने पोबारा केला. रस्त्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट सोडल्यामुळे नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या राज्य विभागाला नव्याने कंत्राटदार शोधून ते काम सुरू करण्यासाठी धावपळ करावी लागली.हा सगळा प्रकार सहा महिन्यांपासून सुरू असताना बांधकाम विभागाने मागविलेल्या ३८३ कोटींच्या निविदांना बाहेरच्या कंत्राटदारांनी प्रतिसाद दिल्यामुळे या कामाचेही औरंगाबाद-सिल्लोड या रस्त्याच्या कामासारखे होणार नाही, याची हमी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
३८३ कोटींतून करणार काय?
३८३ कोटींतून १४ कि़मी. रस्त्यांचे कोणते काम करणार, किती उड्डाणपूल बांधणार. भुयारी मार्गांचा काही समावेश आहे काय? शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी पूल बांधणार की नाही. देवळाई चौकातील वाहतूक कोंडी आणि शिवाजीनगर रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणाबाबत तांत्रिकदृष्ट्या काय उपाययोजना केल्या आहेत. या सगळ्या बाबींचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) मध्ये काही विचार केला आहे की नाही. याची कोणतीही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने समोर आणलेली नाही. नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने ३७९ कोटी रुपयांचा डीपीआर तयार करून दिल्लीतील मुख्यालयाला पाठविला होता. परंतु त्याबाबत आजवर काहीही निर्णय झाला नाही. बायपास हस्तांतरित करण्यावरून कायदेशीर बाबी पुढे आणल्याने तो डीपीआर रद्द झाल्यात जमा आहे. त्या डीपीआरमध्ये तीन उड्डाणपूल व रुंदीकरणासह इतर कामांचा समावेश होता.