बेफाम कारचालकाने वृद्ध सुरक्षारक्षकाला चिरडले, हातपाय तुटून मेंदूच बाहेर पडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 04:46 PM2024-07-23T16:46:22+5:302024-07-23T16:47:03+5:30
शेकोटीजवळ बसलेल्या सुरक्षा रक्षकाच्या अंगावर थेट कार घालून अक्षरश: चिरडून पुढे फरपटत नेले.
छत्रपती संभाजीनगर : बेफाम कारचालकाने रस्त्याच्या कडेला शेकोटी जवळ बसलेल्या वृद्धाला चिरडले. या अपघातात वृद्धाचे हात व पाय धडावेगळे होऊन थेट मेंदूच डोक्याबाहेर पडला. अपघातानंतर चालक पसार झाला. रमेश शंकरलाल अग्रवाल (७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
मुकुंदवाडीत राहणारे रमेश अग्रवाल हे बीड बायपासवरील गांधेली फाट्याजवळ सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. मुसळधार पाऊस पडून गेल्याने थंड वारे सुरू होते. त्यामुळे रमेश रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवून बसले होते. रात्री १२:३० वाजेच्या सुमारास झाल्टा फाट्याकडून देवळाईच्या दिशेने संजय शिवाजी राठोड (३६, रा. परदरी तांडा) हा कारने सुसाट वेगात जात होता. शेकोटीजवळ बसलेल्या रमेश यांच्या अंगावर त्याने थेट कार घालून अक्षरश: चिरडून पुढे फरपटत नेले. आपल्याकडून अपघात झाल्याचे लक्षात आल्यावर राठोड पळून गेला. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत
हा अपघात इतका भीषण होता की, शेकोटीजवळ बसलेल्या रमेश यांच्या अंगावरच थेट कार गेल्याने यांचा डावा हात कोपऱ्यापासून वेगळा झाला. तर उजवा पाय मांडीपासून तुटून बाजूला झाला. संपूर्ण डोके, चेहरा चिरडले जाऊन मेंदू बाहेर पडला. रमेश यांच्या मुलाच्या तक्रारीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात राठोडवर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार विष्णू मुंढे तपास करत आहेत.