दलित वस्तीच्या नऊ कोटींच्या कामांना मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:16 AM2017-11-01T00:16:25+5:302017-11-01T00:16:33+5:30
महापालिका हद्दीअंतर्गत या ना त्या कारणामुळे रखडलेल्या दलित वस्तीच्या कामांना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली असून दोन दिवसांत या कामांच्या निविदा काढण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या पहिल्या टप्प्यातील ९ कोटी ८ लाखांची कामे सुरू झाल्याने दलित वस्तीचा विकास होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका हद्दीअंतर्गत या ना त्या कारणामुळे रखडलेल्या दलित वस्तीच्या कामांना महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी प्रशासकीय मान्यता दिली असून दोन दिवसांत या कामांच्या निविदा काढण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत. जवळपास वर्षभरापासून रखडलेल्या पहिल्या टप्प्यातील ९ कोटी ८ लाखांची कामे सुरू झाल्याने दलित वस्तीचा विकास होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
शहर महापालिकेच्या तत्कालीन सभागृहाने दलित वस्ती निधीअंतर्गत ९ कोटी ८ लाखांच्या ६८ कामांना मान्यता दिली होती. १९ मे २०१७ रोजी ही मान्यता पूर्ण झाली असली तरीही त्यानंतर मात्र राजकीय वाद-विवादात ही कामे रखडली होती. दलित वस्ती निधी संदर्भातील तक्रारी या मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचल्या होत्या. इतकेच नव्हे, तर विधानसभेतही या विषयावर प्रश्न मांडण्यात आले आहेत. दरम्यान, आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात वाद नसलेल्या ९ कोटींच्या कामांना सोमवारी मान्यता दिली आहे. तत्कालीन सभागृहाने मंजूर केलेली ६८ कामे या निधीतून केली जाणार आहेत. या कामाची निविदा दोन दिवसांत निघणार आहे.
त्याचवेळी मनपा प्रशासनाकडून उर्वरित १४ कोटी २७ लाखांच्या कामांचे प्रस्ताव आता आगामी सभागृहात ठेवण्यात येणार आहे. या निधीतून शहरातील निकड असलेली आणि लोकोपयोगी कामे महापालिका प्रशासनाने सुचवून मान्यतेसाठी सदर प्रस्ताव सभागृहापुढे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने पाठविलेल्या १४ कोटी २७ लाखांच्या कामांना मान्यता मिळाल्यानंतर दुसरी टप्प्यातील कामेही शहरात सुरू होतील, असा विश्वास महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.