आठ साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाईची शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:25 PM2018-11-20T18:25:00+5:302018-11-20T18:27:23+5:30
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
औरंगाबाद : गाळप परवाना प्राप्त नसताना विनापरवाना गाळप सुरू केलेल्या आठ साखर कारखान्यांवर दंडात्मक आाणि कायदेशीर (एफआयआर) कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे केली.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात सोमवारी शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सहसंचालक एस. एस. क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, गंगापूर तालुकाध्यक्ष संपत रोडगे पाटील, नंदुरबार येथील पदाधिकारी घनश्याम चौधरी, विठ्ठल पवार आदी उपस्थित होते. एफआरपीचे पैसे न देता अटींची पूर्तता केल्याचा खोटा अहवाल देऊन ऊस गाळप होत आहे. यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी अशा कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करा, अशी मागणी केली. संपत रोडगे यांनी एफआरपीनुसार ऊस उत्पादन शेतकऱ्यांना दर न देणाऱ्या घृष्णेश्वर व मुक्तेश्वर साखर कारखान्यांवर कारवाईची मागणी केली.
यावेळी कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी, स्वाभिमानीचे पदाधिकाऱ्यांत कारखान्यांचे परवाने रद्द करण्यावरून चांगलीच खडाजंगी झाली.
गाळप हंगाम २०१८-१९ मध्ये ज्या साखर कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयाकडून अद्यापपर्यंत गाळप परवाना प्राप्त नसताना गाळप सुरू केलेले आहे, अशा साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात आली. त्यामुळे अखेर मागणीनंतर पाऊल उचलत सहसंचालकांनी एका पत्राद्वारे आठ कारखान्यांवर कारवाई करण्याची साखर आयुक्तांकडे शिफारस केली.
कार्यालयाने मागविले पोलीस
घनश्याम चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्याचा आरोप सातपुडा कारखान्याच्या संबंधितावर करताच चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकाला अरेरावीच्या भाषेत संवाद सुरू होताच साखर सहसंचालक कार्यालयाने पोलिसांची कुमक मागविली होती. मराठवाड्यात सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात ऊस उत्पादित होतो, याची सहसंचालकांना विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी मराठवाड्यातील सर्वात जास्त ऊसतोड मजुरांची संख्या असलेल्या बीड जिल्ह्यात सर्वाधिक ऊस उत्पादन असल्याचे सांगितल्यानेही चांगलाच वाद झाला.
या कारखान्यांवर कारवाईची शिफारस
- घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना, गदाना, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद.
- समृद्धी सहकारी साखर कारखाना, घनसावंगी, जि. जालना.
- जयभवानी सहकारी साखर कारखाना, गढी, ता. गेवराई, जि. बीड.
- एन. एस. एल. शुगर्स प्रा. लि., पवारवाडी, ता. माजलगाव, जि. बीड.
- अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, केज, जि. बीड.
- आयान मल्टिट्रेड एल. एल. पी. (अॅस्टोरिया अॅग्रो अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि) समशेरपूर.
- संत एकनाथ सहकारी साखर कारखाना, एकनाथनगर, ता. पैठण, जि. औरंगाबाद.
- वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, पांगरी, ता. परळी, जि. बीड.