बिगरव्याजी १ हजार कोटींची शिफारस
By Admin | Published: January 2, 2015 12:31 AM2015-01-02T00:31:32+5:302015-01-02T00:44:14+5:30
वडीगोद्री : साखरेचे भाव बाजारात उतरल्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांच्या उसाला दर कमी मिळत आहे
वडीगोद्री : साखरेचे भाव बाजारात उतरल्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांच्या उसाला दर कमी मिळत आहे. ऊस उत्पादकांना मदत मिळण्यासाठी केंद्राकडे बिगरव्याजी एक हजार कोटींची उचल मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस केल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
वडीगोद्री येथे आयोजित सत्कार समारंभात तावडे बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, मराठवाडा संघटनमंत्री प्रवीण घुगे, देवीदास खटके, कृष्णा जिगे, दीपक ठाकूर, संजय हर्षे, किरण खरात, राहुल लोणीकर, आनंदराव घाडगे आदी उपस्थित होते.
तावडे पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीयमंत्र्यांना भेटून ऊस उत्पादकांचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली आहे.
सर्वसामान्य माणसाला व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले सरकार सातत्याने कार्यरत राहिल, असेही तावडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात सध्या दुष्काळी चित्र असून त्यावर मात करण्यासाठी शासन पातळीवर उपाययोजनांची कामे सुरू आहेत. आगामी काळात सर्वांना शुद्ध पाणी देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.
यावेळी राम लांडे, संजय तौर, सुनील आर्दड, कानिफनाथ, सुरेश काळे, विजय नाझरकर, विजय खटके आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)