पोलिसांच्या मदतीने त्यांच्या संसारात समेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:12 AM2017-11-07T00:12:23+5:302017-11-07T00:12:30+5:30
बीड ग्रामीण पोलिसांनी तुटलेल्या संसारात समेट घटवून आणत दाम्पत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पोलिसांनी मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. बीड ग्रामीण पोलिसांनी तुटलेल्या संसारात समेट घटवून आणत दाम्पंत्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बीड तालुक्यातील मोरगाव येथील दशरथ बळीराम कागदे यांचा पाच वर्षांपूर्वी अनिता नामक मुलीशी विवाह झाला. काही दिवस सुखाने संसार चालला. परंतु दोघांमध्ये काही दिवसांनंतर मतभेद निर्माण झाले. अनेकवेळा टोकाचे वादही झाले. अनिताने बीड ग्रामीण ठाण्यात धाव घेत दशरथ कागदेविरुद्ध मानसिक, शारीरिक छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले, परंतु मिटले नाही. अखेर ग्रामीण ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस हवालदार सातपुते यांनी दोन्ही कुटुंबातील लोकांना एकत्रित बसविले, त्यांचे समुपदेशन करीत दोघांच्या संसारात समेट घडवून आणला. सोमवारी अनिताला दशरथच्या स्वाधीन करीत नांदावयास पाठविले. खाकीतील सहृदयतेचे स्वागत होत आहे.