देशात १०० कोटी डोसचा विक्रम, इकडे निम्म्या जिल्ह्याला लसीचे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 04:38 PM2021-10-22T16:38:01+5:302021-10-22T16:41:17+5:30
औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत फिरलो, पण काहीही झाले नाही, कशाला लस घ्यायची...’, ‘संपला कोरोना, लस घेऊन कोण आजारी पडणार...’ अशी एक ना अनेक कारणे सांगून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे टाळले जात आहे. विशेषत: ग्रामीण भागांत लसीकडे पाठ फिरविली ( half of the Aurangabad district is without vaccinated) जात आहे. ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष मोहीमही राबविण्यात आली. परंतु लसरूपी कवच घेण्यापासून अनेक जण चार हात दूरच आहेत.
गुरुवारी देशाने १०० कोटी डोसचा पल्ला देशाने पार केला. या विक्रमी कामगिरीचा देशभरात जल्लोष करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे. अवघ्या २१ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये, शहरातील काही भागांत लसीकरणाचे अत्यल्प प्रमाण आहे. ग्रामीण भागासाठी सध्या ७० हजार डोस उपलब्ध आहेत.
२३ हजार गरोदर माता, पण...
जिल्ह्यात २३ हजार गरोदर माता आहेत. मात्र यातील केवळ साडेपाच हजार जणींनी लस घेतली आहे. लस घेतल्यावर बाळाला काही झाले तर या चिंतेने लस घेतली जात नाही. मातेची इच्छा असली तरी घरातील इतर जण रोखतात.
लसीकरणाचे मायक्रोप्लॅनिंग
लसीकरणाचे मायक्रोप्लॅनिंग करण्यात आले आहे. आता सर्व महाविद्यालयांत लसीकरण शिबिर घेण्यासाठी पत्र देण्यात येत आहे. ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
- डाॅ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
लसीकरणास प्राधान्य द्या
ज्यांना केंद्रापर्यंत जाता येत नाही, अशांना घरी जाऊन लस दिली जात आहे. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे लस घ्या.
- डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्ह्यातील लसीकरण :
-१६ ते ३१ जानेवारी- ८,२०८
- १ ते २८ फेब्रुवारी-२३,११७
-१ ते ३१ मार्च- १,३०,३२८
-१ ते ३० एप्रिल- २,७७,२३०
- १ ते ३१ मे -१,४५,४५०
- १ ते ३० जून- २,४६, ०४१,
-१ ते ३१ जुलै - ३,३१,९३९
-१ ते ३१ ऑगस्ट-३,४९, ५७८
-१ ते ३० सप्टेंबर- ५,०३,९८२
- १ ते २० ऑक्टोबर-३,३२,३१६