बाजारात टोमॅटो १५० रुपये किलो; शेतकऱ्याच्या हातात पडतात फक्त ७५ रुपयेच
By प्रशांत तेलवाडकर | Published: July 7, 2023 12:44 PM2023-07-07T12:44:29+5:302023-07-07T12:45:39+5:30
भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला.
छत्रपती संभाजीनगर : आजपर्यंतचा भाववाढीचा विक्रम मोडीत काढत टोमॅटो भाजीमंडीत १५० रुपये किलोने विकला जात आहे. टोमॅटो महाग झाले असले तरी पण शेतकऱ्यांच्या खिशात पैसे जात असल्याने सर्वसामान्य ग्राहक शांत बसला आहे. पण वास्तव तसे दिसत नाही, दीडशे रुपयांना जरी टोमॅटो विकले जात असले तरी उत्पादकांच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. बाकीची रक्कम वितरण प्रणालीच्या गल्ल्यात जमा होत आहे.
शहरातील भाजीमंडईत महिनाभरापूर्वी ५ ते १० रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटो अचानक १५० रुपयांवर जाऊन पोहोचला. यामुळे सर्वांचे डोळे पांढरे झाले आहेत. नुसते टोमॅटो नाही तर अन्य भाज्याही ८० ते १०० रुपये किलो दरम्यान विकत आहेत. टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने व मागणी वाढल्याने भाव वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत. असे असले तरी झालेली भाववाढ ही सर्वसामान्यांच्या पचनी पडत नाही. मात्र, टोमॅटो उत्पादकांना किलोमागे १०० ते १३० रुपये मिळत असतील, अशी धारणा ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा याबाबत शेतकऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा वेगळेच चित्र समोर आले. बाजारात जरी १५० रुपये भाव असला तरी किलोमागे ७० ते ७५ रुपये मिळत असल्याचे उत्पादकांनी सांगितले. यामुळे या टंचाईचा फायदा कोण उचलते, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शेतकऱ्याच्या नावावर दलाल करतात कमाई
मी पाच एकरवर टोमॅटो लावले. मे महिन्यात प्रतिकॅरेट (२५ किलो) ४० ते ५० रुपयांना विकावे लागले. भाववाढीचा काय फायदा. बाजारात १५० रुपये जरी विकत असले तरी उत्पादकाच्या हातात ७० ते ७५ रुपयेच पडत आहेत. पिकविणाऱ्यांना पैसे मिळत नाही आणि खाणाऱ्यांना स्वस्त मिळत नाही, अशी अवस्था असून मधले दलालच मलाई खात आहेत.
- वाल्मीक शिरसे टोमॅटो उत्पादक (बहिरगाव,ता.कन्नड)
भाव वाढले पण शेतकऱ्याला नाही फायदा
नवीन टोमॅटो ऑगस्ट महिन्यात येतील. सध्या टोमॅटोची टंचाई आहे. आमच्याकडेही टोमॅटो नाही. एप्रिल- मे महिन्यात मातीमोल भावात टोमॅटो विकल्या गेले. आता भाव वाढला आहे. मात्र, शेतात टोमॅटो नसल्याने या भाववाढीचा उत्पादकांना काय फायदा. जेव्हा आमच्याकडे टोमॅटो येतील तेव्हा भाव पडतील. हेच तर शेतकऱ्याचे दुखणे आहे.
- संजय दांडगे शेतकरी (वरुड काझी)
भाव वाढूनही शेतकऱ्याचे उत्पन्न कमीच
१० टन टोमॅटो होते तेव्हा १० रुपये किलोने विकल्या जात होते. आता १ टन टोमॅटो आहे तर त्यास १५० रुपये किलो भाव मिळत आहे. जेव्हा समाधानकारक उत्पादन होते तेव्हा टोमॅटोला एवढा भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता २०० रुपये भाव झाला तरी उत्पादनच कमी असल्यावर शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत नाही.
- भगवान कापसे कृषितज्ज्ञ
जाधववाडीत टोमॅटोची ६४ क्विंटलच आवक
जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या फक्त ५० ते ६४ क्विंटल टोमॅटोची आवक होत आहे. यात कन्नड तालुक्यातून व श्रीरामपूरमधून टोमॅटो येत आहे. गुरुवारी ३७०० ते १६००० रुपये प्रतिक्विंटल भाव टोमॅटोला मिळाल्याची माहिती कृउबा समितीने दिली.