दोन दिवसांमध्ये ३४ लाख रुपये वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 06:33 PM2019-01-14T18:33:10+5:302019-01-14T18:33:24+5:30
दोन दिवसांमध्ये मनपाच्या तिजोरीत ३४ लाख रुपये आले. या मोहिमेंतर्गत थकीत करावर ५० टक्के सूट दिली जात आहे.
औरंगाबाद : मालमत्ताकर, पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने १२ जानेवारीपासून मोहीम सुरू केली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशीही ११ लाख ३४ हजार रुपये वसूल झाले. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २३ लाख रुपये जमा झाले होते. दोन दिवसांमध्ये मनपाच्या तिजोरीत ३४ लाख रुपये आले. या मोहिमेंतर्गत थकीत करावर ५० टक्के सूट दिली जात आहे.
महापालिकेने यंदा मालमत्ताकर, पाणीपट्टीच्या वसुलीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वसुलीत निष्काळजीपणा करणाऱ्या दोन अधिकाºयांवर निलंबनाचीही कारवाई करण्यात आली आहे. वसुलीसाठी स्वतंत्र पथके नेमली आहेत. सकाळी ८ ते १२ या वेळेत या पथकांनी वसुली करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. यंदा मालमत्ताकराचे उद्दिष्ट ३४० कोटी रुपये आहे. आतापर्यंत मनपाला ७४ कोटी रुपये वसूल करता आले आहेत. ३१ मार्चपर्यंत जास्तीत जास्त वसुली कशी होईल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
नोव्हेंबर महिन्यात थकबाकीवर ७५ टक्के सूट देऊन वसुलीसाठी मनपाने प्रयत्न केले. आठ दिवसांमध्ये फक्त ११ कोटी रुपये वसूल झाले होते. आता १२ जानेवारीपासून पुन्हा व्यापक वसुली मोहीम सुरू केली आहे. यामध्ये मालमत्ताधारकांना थकबाकीवर पन्नास टक्के सूट देण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी मालमत्ताकरापोटी १८ लाख ४० हजार, पाणीपट्टी वसुलीपोटी ४ लाख ९३ हजार रुपये वसूल झाले. रविवारी दिवसभरात मालमत्ताकर १० लाख ६४ हजार, पाणीपट्टीपोटी ६९ हजार ६१२ रुपये, असे एकूण ११ लाख ३४ हजार रुपये वसूल करण्यात आले. वसुली मोहीम ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.