बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच 

By विकास राऊत | Published: September 28, 2024 06:39 PM2024-09-28T18:39:27+5:302024-09-28T18:39:31+5:30

लाचखोरीच्या सापळ्यात अडकला तलाठी

Recovery of money paid for transfer from talathi; Bribes were taken while preventing manipulations  | बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच 

बदलीसाठी दिलेल्या पैशांची तलाठ्यांकडून वसुली; फेरफार अडवून ठेवत घेतली लाच 

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने गेल्या महिन्यात केलेल्या तलाठी बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण झाले. दरम्यान, बदलीसाठी दिलेली रक्कम वसूल करण्यासाठी तलाठ्यांनी आता सामान्यांच्या खिशात हात घालण्यास सुरुवात केली आहे. फेरफार अडवून ठेवत लाखो रुपयांची मागणी केल्यामुळे सातारा-देवळाईचे तलाठी दिलीप जाधव याला लाच घेताना एसीबी पथकाने पकडले. यातून तलाठी बदल्यांसाठी झालेला लिलाव स्पष्ट होत आहे.

‘पैसे कमवायचे असतील, तर पैसे द्यावेच लागतील’, या वृत्तीने तलाठी बदलीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली. ती रक्कम वसूल करण्यासाठी काही तलाठी सरसावल्याचे दिसत आहेत. बदलीनंतर तलाठ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये उफाळून आलेला वाद ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला होता.

बदल्यानंतर तलाठ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये मर्जीतील ठिकाण मिळण्यासाठी ३ ते १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मोजल्याची चर्चा होती. ही रक्कम कुणी-कुणाला दिली आणि कुणी-कुणाकडून घेतली, यावरून बदल्यांच्या प्रक्रियेत असलेले वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले. शासनाने बदल्यांसाठी घालून दिलेल्या निकषाची पायमल्ली झाली. याप्रकरणात चौकशी सुरू असून अहवाल आल्यानंतरच किती आर्थिक उलाढाल, हे समोर येईल.

महिनाभरातच ती भीती ठरली खरी
मर्जीतील सज्जा मिळण्यासाठी ३ ते १२ लाख एवढी रक्कम देणाऱ्या तलाठ्यांनी ती पगारातून दिली असेल का? उदाहरण म्हणून एका सज्जा-मंडळसाठी तीन वर्षांसाठी १२ लाख दिले. म्हणजे वर्षाला ४ लाख याप्रमाणे महिना ३० ते ३५ हजार वरकमाई करावीच लागणार, हे स्पष्ट आहे. हे ३० ते ३५ हजार सामान्य लोकांच्या खिशातूनच घेतले जाणार, हे निश्चित आहे. या चक्रव्यूहात तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकून बदनाम होईल, अशी भीती तलाठ्यांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपमध्ये होती. त्यानंतरच महिनाभरातच तलाठी जाधव अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला.

Web Title: Recovery of money paid for transfer from talathi; Bribes were taken while preventing manipulations 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.