औरंगाबादमध्ये आरटीओचा कर बुडवणाऱ्या तीनशे वाहनधारकांकडून ७० लाख रुपये वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:50 PM2018-02-16T13:50:58+5:302018-02-16T13:52:48+5:30
आरटीओ कार्यालयात ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहन नॉनट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना कर बुडविणार्या ३०० वाहनधारकांकडून सुमारे ७० लाख रुपये वसूल झाले आहेत.
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहन नॉनट्रान्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना कर बुडविणार्या ३०० वाहनधारकांकडून सुमारे ७० लाख रुपये वसूल झाले आहेत. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कारवाईत अद्याप ५०० वाहनधारकांकडून बुडवलेला कर वसूल करणे बाकी आहे.
आरटीओ कार्यालयात ट्रान्स्पोर्ट संवर्गातील वाहन नॉनट्रॉन्सपोर्ट संवर्गात रूपांतरित करताना नियमानुसार कर न भरता शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविल्याचा प्रकार २८ जून २०१६ रोजी ‘लोकमत’ने सर्वप्रथम समोर आणला. या प्रकाराविषयी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. या ‘करबुडवेगिरी’ प्रक रणात जवळपास ८०० वाहनांनी कर बुडविल्याचे समोर आले. कायदेशीर कारवाई करण्याची तयारी केल्याने अनेक वाहनधारकांनी कर भरण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तीनशे वाहनधारकांकडून जवळपास ७० लाख रुपये वसूल झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. २ कोटींचा महसूल बुडवला
मुंबईहून आलेल्या पथकाने दोन दिवस घेतलेल्या आरटीओ कार्यालयाच्या झडतीत हा प्रकार समोर आला होता. यात तब्बल ८०० वाहनांनी कर कमी भरल्याने २ कोटींचा महसूल बुडाल्याचा प्रथमदर्शनी निष्कर्ष काढण्यात आला.याप्रकरणी काही अधिकारी आणि कर्मचार्यांची चौकशी करण्यात आली.