सातारा-देवळाई वाॅर्डाची वसुली साडेनऊ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:06 AM2021-01-08T04:06:36+5:302021-01-08T04:06:36+5:30
-साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : सातारा-देवळाई वाॅर्डाची मालमत्ता व पाणीपट्टी वसुली साडेनऊ कोटींवर गेल्यावरही वर्षभरापासून विकासकामाला हात लावला नाही. सातारा-देवळाई ...
-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : सातारा-देवळाई वाॅर्डाची मालमत्ता व पाणीपट्टी वसुली साडेनऊ कोटींवर गेल्यावरही वर्षभरापासून विकासकामाला हात लावला नाही.
सातारा-देवळाई परिसरातील मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या पैशातून विविध कॉलनी, सोसायटींत रस्ते, पथदिवे, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. विकासासाठी मनपा प्रशासनाकडून पावले का उचलली जात नाहीत, असा सवालही नागरिकांतून सातत्याने उपस्थित केला जात आहे. सिडकोकडून मनपाला मिळालेल्या पैशातून काही कामे झाली, त्यातही रेणुका माता मंदिर रस्त्याचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. १/४/२०२० ते ४/१/२०२१ पर्यंत मालमत्ता कर ८ कोटी ७० लाख ५९ हजार ३३७ रुपये, तर पाणीपट्टी ७६ लाख २८ हजार ५८८ रुपये जमा झाली असून, हा आकडा साडेनऊ कोटींच्या पुढे सरकतो आहे. यातील एकही पैसा सातारा-देवळाई परिसरातील समाविष्ट आठ वाॅर्डांवर खर्च करण्यात आलेला नाही. जमा होत असलेल्या पैशातून रस्ते, दिवे, ड्रेनेज लाइन, उद्यान विकसित करायला हवे. वसुली जरी जोरात असली तरी विकासकामे कोमात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ठोस भूमिका घ्यावी...
किती दिवस घुसमट सहन करायची. प्रत्येक वेळी निवेदने, विनंती, अर्जफाटे करून जनता वैतागली आहे. मनपाने यावर ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी माजी उपसरपंच राजू नरवडे, नामदेव बाजड, ॲड. शिवराज कडू पाटील, रमेश बाहुले यांनी केली आहे.
वरिष्ठ निर्णय घेतील....
नागरिकांनी कर जमा करून मनपाला सहकार्य करावे. विकासकामांसाठी वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतील. नवीन कामे प्रस्तावित आहेत. पाठपुरावा सुरू आहे. -डाॅ.संतोष टेंगळे वाॅर्ड अधिकारी, सातारा-देवळाई.