बांधकाम मलब्याचे रिसायकलिंगकरून कच, पेव्हर ब्लॉक तयार होणार; मनपा उभारणार प्रकल्प
By मुजीब देवणीकर | Published: August 17, 2023 03:45 PM2023-08-17T15:45:04+5:302023-08-17T15:45:17+5:30
या प्रकल्पासाठी महापालिका पीपीपी मॉडेलचा विचार करत आहे
छत्रपती संभाजीनगर : इंदूर शहरात बांधकाम साहित्यापासून पेव्हर ब्लॉक म्हणजेच गट्टू तयार केले जातात. अशाच पद्धतीचा प्रकल्प मनपा पीपीपी मॉडेलवर सुरू करणार आहे. या संदर्भात लवकरच प्रकल्प आराखडा केला जाईल, असे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले. यासाठी विशेष निधीची तरतूददेखील करण्यात येणार आहे.
शहरात जुन्या इमारती पाडून नवीन बांधकामेही सुरू आहेत. निरंतर चालणारी ही प्रक्रिया आहे. शहरात दररोज बांधकाम साहित्य ठिकठिकाणी आणून टाकले जाते. यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे अनेक भागात डोंगर तयार होत आहेत. काही मैदानांवरही ढिगारे तयार झाले आहेत. त्यांची विल्हेवाट लावणे तसे जिकरीचे काम असल्याने या बांधकाम साहित्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार केल्यावर इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला जाईल.
गट्टू तयार केल्यावर सर्वात मोठा ग्राहक मनपाच राहणार आहे. मनपा कंपनीला बांधकाम साहित्य उपलब्ध करून देईल. इंदूर शहरात याच प्रक्रिया केंद्रातून तयार झालेले पेव्हर ब्लॉक वापरले जातात. आपल्या शहरातदेखील हाच पॅटर्न राबविण्याची इच्छा असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.