लाल दिव्यासाठी रस्सीखेच सुरू !
By Admin | Published: March 6, 2017 12:36 AM2017-03-06T00:36:38+5:302017-03-06T00:37:41+5:30
बीड : जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने अध्यक्षपदी मंगल प्रकाश सोळंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले; परंतु आता काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष व सभापतीपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
बीड : जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीने अध्यक्षपदी मंगल प्रकाश सोळंके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले; परंतु आता काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष व सभापतीपदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. तथापि, युद्धात हारलेल्या भाजपने तहात बाजी मारण्याची रणनीती आखून राष्ट्रवादीसमोरील अडचणी वाढविण्यास सुरुवात केली आहे.
सर्वाधिक २५ जागा जिंकून राष्ट्रवादी जि.प. मध्ये अग्रस्थानी आहे. काँग्रेसचे तीन सदस्य सोबत घेतले तरीही त्यांना सत्तास्थापनेसाठी आणखी तीन सदस्यांची आवश्यकता आहे. मुंबईत शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत काकू- नाना आघाडीला सोबत घ्यायचे की नाही? यावर तोडगा निघाला नाही. संदीप क्षीरसागर यांची मदत घेण्यास काका आ. जयदत्त क्षीरसागर व जिल्हाप्रमुख डॉ. भारतभूषण क्षीरसागर अनुत्सूक आहेत. याउलट विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र आघाडीची मदत घेण्याची तयारी दर्शवली आहे.
राष्ट्रवादी कोणाच्या मदतीने ‘लाल दिवा’ गाठणार ? याचे कोडे कायम असतानाच आता काँग्रेसने राष्ट्रवादीला ‘हात’भार लावण्याच्या बदल्यात उपाध्यक्ष व सभापतीपदावरही दावा सांगितला आहे. विद्यमान उपाध्यक्षा आशा दौंड यांना आपली खुर्ची यावेळीही शाबूत ठेवायची आहे.
दुसरीकडे पहिल्यांदाच मिनीमंत्रालयात पोहोचलेल्या राजेसाहेब देशमुख, प्रदीप मुंडे यांनीही ‘व्हीआयपी पोस्ट’साठी जोरदार लॉबिंंग सुरु केले आहे. त्यामुळे पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसमधील दुहीचा फायदा भाजप घेऊ शकते.
मुंबई महापालिकेत भाजपने शिवसेनेच्या सोयीचा निर्णय घेतला. त्यामुळे जि. प. मध्ये १९ सदस्य संख्या असलेल्या भाजपला शिवसेनेच्या चार सदस्यांची मदत मिळू शकते. याखेरीज पहिल्याच प्रयत्नात शिवसंग्रामने चार जिंकून आपले स्थान बळकट केले आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे व आ. विनायक मेटे यांची बैठक झाल्याने त्यांच्यातील मतभेद संपुष्टात आल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.
शिवसंग्रामने भाजपला साथ दिल्यास युतीचे संख्याबळ २६ पर्यंत पोहोचणार आहे. भाजपने काकू- नाना आघाडीला गळाला लावल्यास तेही सत्तेच्या समीप पोहोचू शकतात. जि.प. मध्ये पोहोचलेल्या दोन अपक्षांच्या भूमिकेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)