कत्तलखान्यावर धाड; मोठ्या प्रमाणात मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 11:32 PM2017-09-03T23:32:24+5:302017-09-03T23:32:24+5:30
आष्टी पोलिसांच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे राजरोसपणे खुलेआम शेकडो जनावरांची रोज कत्तल केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव रविवारी उघडकीस आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : आष्टी पोलिसांच्या ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्षामुळे राजरोसपणे खुलेआम शेकडो जनावरांची रोज कत्तल केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव रविवारी उघडकीस आले. यावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून धाड टाकल्यानंतर लाखो रुपयांच्या मांसासह २७ जनावरांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे माहिती मिळाल्यापासून तब्बल तीन तास उशिराने आष्टी पोलिसांनी धाड टाकल्याने संशय व्यक्त होत आहे. पोलीस येईपर्यंत गुन्हेगार कत्तलखाना बंद करून पसार झाले होते. हा सर्व प्रकार खडकत येथे शनिवारी रात्री ९ वाजता घडला.
खडकत येथे खुलेआम गाय व इतर जनावरांची राजरोसपणे कत्तल होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना समजली. त्यांनी तात्काळ आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती देऊन धाड टाकण्याचे आदेश दिले. ही माहिती साधारण सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देण्यात आली. मात्र, पोलिसांनी तब्बल तीन तास उशिराने कत्तलखान्यावर धाड टाकली. ठाण्यातूनच ही माहिती ‘फुटली’ व कत्तलखान्यावर पोहोचली. त्यामुळेच ते सर्व काही जनावरांसह मांस जागेवरच ठेऊन कत्तलखान्याला कुलूप लावून पसार झाले.
दरम्यान, उशिराने धाड टाकणाºया पोलिसाच्या हाती केवळ मुनार जब्बार शेख (रा.मिस्जद गल्ली) हा एकमेव आरोपी हाती लागला. इतर सर्व फरार होण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला असून यामध्ये मुनारसह मुक्तदीर आबेद शेख, नासीर बाबूलाल पठाण या दोघांचा समावेश आहे. हे दोन आरोपी मुद्देमालासह पसार झाले.
घटनास्थळी पशू वैद्यकीय अधिकाºयांना पाचारण करण्यात आले होते. परंतु रात्र असल्याने ते पोहचू शकले नाहीत. रविवारी सकाळी या घटनेचा पंचनामा करण्यात आला. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.