कचरा उचलणाऱ्या रेड्डी कंपनीने आतापर्यंत घेतले ७ बळी; निष्काळजीपणे वाहतूक कधी थांबणार?
By मुजीब देवणीकर | Updated: October 4, 2023 18:58 IST2023-10-04T18:55:45+5:302023-10-04T18:58:04+5:30
वर्दळीच्या रस्त्यांवरून हा कचरा लवकरात लवकर प्रक्रिया केंद्रावर नेण्याची घाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांना असते.

कचरा उचलणाऱ्या रेड्डी कंपनीने आतापर्यंत घेतले ७ बळी; निष्काळजीपणे वाहतूक कधी थांबणार?
छत्रपती संभाजीनगर : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी महापालिकेने रेड्डी कंपनीला २०१९ मध्ये कंत्राट दिले. मागील चार-पाच वर्षांत कंपनीने तब्बल ७ निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्याची माहिती आहे. यातील बहुतांश बळी निष्काळजीपणे वाहन चालविल्याचे आहेत. वारंवार अपघात होत असतानाही कंपनीकडून कोणतीही खबरदारी घेण्यात येत नाही, हे विशेष.
रेड्डी कंपनीच्या ३०० रिक्षा कचरा संकलनासाठी ११५ वॉर्डांत नियुक्त केल्या आहेत. घंटागाडीत जमा होणारा कचरा एका मोठ्या कॉम्पॅक्टरमध्ये टाकण्यात येतो. हा कचरा कॉम्पॅक्टरद्वारे चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव येथील प्रक्रिया केंद्रावर नेण्यात येतो. घंटागाड्यांचा कचरा एकत्रित करण्यासाठी शहरात एकूण ९ ठिकाणे निश्चित केली आहेत. २० पेक्षा अधिक कॉम्पॅक्टरद्वारे दररोज ४०० ते ४५० मे. टन कचऱ्याची वाहतूक होते. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांत जास्त कचऱ्याची वाहतूक होते. सायंकाळी ७ नंतर अत्यंत कमी वाहने वापरली जातात.
सकाळी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. वर्दळीच्या रस्त्यांवरून हा कचरा लवकरात लवकर प्रक्रिया केंद्रावर नेण्याची घाई कंपनीच्या कर्मचाऱ्यांना असते. अन्य वाहनधारकांची कोणतीही पर्वा न करता ही वाहने अत्यंत निष्काळजीपणे चालविण्यात येतात. त्यातून अनेकदा अपघात झाले आहेत. पण, यातून कंपनीने कोणताही बोध घेतला नसल्याचे दिसून येते.
कंत्राटी चालक, पगाराचे वांधे
रेड्डी कंपनीने अत्यंत कमी पगारावरील चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना मोठी वाहने चालविण्याचा अनुभव आहे किंवा नाही, हे सुद्धा तपासलेले नाही. पगार कमी असल्याच्या मुद्यावरून कंपनीच्या चालकांनी अनेकदा मनपासमोर आंदोलने केली.
वारंवार सूचना दिल्या जातात
खासगी कंपनीच्या वाहनांच्या फिटनेसची आणि कागदपत्रांची तपासणी केली जाते. चालकांनी वाहने सावकाश हळुवारपणे चालवावीत, अशा सूचना मनपाकडून नेहमी देण्यात येतात. मंगळवारी दुपारी झालेला अपघात दुर्दैवी असून, कंपनीला पुन्हा एकदा काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- सोमनाथ जाधव, उपायुक्त, घनकचरा विभाग.