लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्रे नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:04 AM2021-02-23T04:04:32+5:302021-02-23T04:04:32+5:30

औरंगाबाद : सुरक्षित प्रवास म्हणून लालपरी म्हणजेच एस. टी. महामंडळाच्या बसेसची ओळख आहे. पण, ही ओळख कायम राहावी, याकडे ...

Redhead insecure; Fire extinguishers in name only | लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्रे नावालाच

लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्रे नावालाच

googlenewsNext

औरंगाबाद : सुरक्षित प्रवास म्हणून लालपरी म्हणजेच एस. टी. महामंडळाच्या बसेसची ओळख आहे. पण, ही ओळख कायम राहावी, याकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. कारण अनेक बसगड्यात मुदतबाह्य अग्निशमन यंत्रे आहेत, तर काही बसेस अग्निशमन यंत्रांशिवायच धावत असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या पाहणीत आढळून आले.

मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी दुपारी काही एस. टी.ची पाहणी केली. यावेळी शिवनेरी आणि शिवशाही बसमध्ये अग्निशमन यंत्रे सुस्थितीत आढळून आली. पण साधी (लालबस) आणि एमएस बॉडीच्या बसगाड्यांत मुदतबाह्य यंत्रे पाहायला मिळाली. काही बसमध्ये अग्निशमन यंत्रांवर तर मुदतच नव्हती. चालकाच्या केबिनमध्ये अग्निशमन यंत्रे अस्ताव्यस्त पडून असल्याचेही पाहायला मिळाले. दोन बसमध्ये ही यंत्रे आढळून आली नाहीत. याविषयी चालक, वाहकांना विचारणा केली असता जी बस दिली जाते, ती घेऊन रवाना व्हावे लागते. त्यात अग्निशमन यंत्रणा कशी आहे, याकडे लक्ष दिले जात नाही. ही जबाबदारी आगार पातळीवरील कर्मचाऱ्यांची असते, असे त्यांनी सांगितले.

या बसमध्ये पाहणी

१) एमएच - १४ बीटी २५०५

२)एमएच - २० बीएल ३५९५

३)एमएच - ०६ एस ८७३०

४)एमएच - ०६ एस ८१२१

५)एमएच - २० ईएल २४५२

---

प्रथमोपचार पेट्याही गायब

एसटीमधून प्रथमोपचार पेट्याही गायब झाल्या आहेत. काही बसमध्ये या पेट्या दिसल्या, पण त्यात मलम,पट्टी असे उपचाराचे एकही साहित्य नव्हते. प्रवासी साहित्य काढून घेतात, त्यामुळे चालकाकडे हे साहित्य असते, असे काही वाहकांनी सांगितले.

---

आगारात आओ जाओ घर तुम्हारा

मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारात बसेस उभ्या केल्या जातात. बसस्थानक आणि आगार यामध्ये सुरक्षारक्षकांची केबिन आहे. पण आगारात जाताना कुणालाही रोखले जात नाही. बसजवळ कोणीही सहजपणे जाऊ शकतो. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा अशी अवस्था आहे.

---

वायफाय सुविधा नावालाच

प्रवासादरम्यान प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, यासाठी एस. टी. बसेसमध्ये वायफाय बसविण्यात आले आहे. पण वायफाय बंद आहे. त्यामुळे ही सुविधा प्रवाशांना आजघडीला वापरताच येत नाही. वायफाय शोभेच्या वस्तूच ठरत आहेत.

---

नो स्मोकिंग झोन

लोकमत प्रतिनिधीने पाहणी केली, तेव्हा बसस्थानक आणि आगार परिसरात बसजवळ कोणीही विडी, सिगारेट पिताना आढळून आले नाही. सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांकडून विडी, सिगारेट पिण्याचे टाळण्यात येत असल्याचे दिसले. मात्र, अनेकदा प्रवासी बसस्थानकातच विडी, सिगारेट ओढत असल्याचे एस. टी. कर्मचाऱ्यांनी सांगितले.

----

एस. टी.ची आतून दुरवस्था

अनेक बसेसच्या आतमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. जागोजागी पडलेला कचरा, थुंकून लाल झालेले सीटजवळील जागा, असे चित्र आहे. वरवर निर्जंतुकीकरण केले जात आहे. काही बसच्या खिडक्या खिळखिळ्या झालेल्याही पाहायला मिळाल्या.

---

सुरक्षारक्षक तैनात

बसस्थानकात सुरक्षारक्षक, वॉचमन तैनात आहेत. आगारात बाहेरच्या लोकांना प्रवेश नाकारला जातो. बसजवळ कोणी नाही ना, दरवाजा उघडा आहे का, याची वेळोवेळी तपासणी त्यांच्याकडून केली जाते.

- एस. ए. शिंदे, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक

---

फोटो ओळ

१) एस. टी. बसमध्ये अशा प्रकारे प्रथमोपचार पेट्यांची दुरवस्था झाली आहे.

२) एस. टी.तील मुदतबाह्य अग्निशमन यंत्रे.

Web Title: Redhead insecure; Fire extinguishers in name only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.