मराठवाड्यात टँकरचा आकडा कमी; पण टंचाईच्या झळा वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 07:20 PM2018-04-26T19:20:34+5:302018-04-26T19:22:46+5:30
मराठवाड्यात यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत टँकरचा आकडा कमी असला तरी टंचाईच्या झळा मात्र वाढू लागल्या आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा मागील पाच वर्षांच्या तुलनेत टँकरचा आकडा कमी असला तरी टंचाईच्या झळा मात्र वाढू लागल्या आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत ग्रामीण भागाला टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा करावा लागणार आहे. तीन जिल्ह्यांत पाणीटंचाईची परिस्थिती नाजूक वळणावर आहे.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी बुधवारी मराठवाड्यातील जलयुक्त शिवार योजना, टँकरने पाणीपुरवठा, शेततळे, प्रकल्पांतील पाणीसाठा, विहिरींचे अधिग्रहण याबाबत माहिती दिली. आयुक्त डॉ. भापकर म्हणाले, मराठवाड्यात लहान-मोठे व मध्यम ८६७ प्रकल्प आहेत. २३ टक्के पाणीसाठा आहे. ११ मोठी धरणे आहेत. जायकवाडीत ४५ टक्के पाणीसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये २६ टक्के पाणी आहे. ४७२ टँकर विभागात सुरू आहेत. त्यात औरंगाबादेत सर्वाधिक टँकर सुरू आहेत. परभणी, नांदेडमध्येही टँकर सुरू आहेत. विहिरींचे अधिग्रहण करावे लागले आहे. जास्तीत जास्त विहिरी औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यात आहेत. पाच वर्षांतील स्थिती पाहिली तर यावर्षी सर्वाधिक कमी टँकर आहेत.
११ प्रकल्पांवर मोठी शहरेअवलंबून आहेत. एमआयडीसी व प्रादेशिक योजनांना यातून पाणीपुरवठा होतो आहे. यावर्षी आराखडा तीन टप्प्यांत केला होता. दर तीन महिन्यांसाठी आराखडा होता. एप्रिल ते जून या कालावधीसाठी केलेल्या आराखड्यासाठी काही योजनांचा अंतर्भाव केला आहे.
गेल्या वर्षी ८६ टक्के पाऊस विभागात झाला. औरंगाबाद, नांदेड, जालना जिल्ह्यात पाऊस कमी झाला. चार ते पाच वर्षांच्या तुलनेत यंदा टँकरची संख्या कमी आहे. जलयुक्त शिवार योजनेचाही फायदा झाला आहे. जायकवाडी भरल्यामुळे टंचाई कमी झाली आहे. जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात काम होत आहे. ५० हजार विहिरींचे काम गेल्या दोन वर्षांत झाले आहे. ३१ हजार विहिरींचे काम प्रगतिपथावर आहे. २६ हजार शेततळी विभागात दिली आहेत, असे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.
वर्ष टँकरचा आकडा
२०१३-१४ २१३६
२०१४-१५ १४४४
२०१५-१६ ४०१५
२०१६-१७ ०९४०
२०१७-१८ ०४७२
एकूण ९०३७