उपचार सुविधांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर भर- जे. पी. नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 01:41 PM2018-02-11T13:41:05+5:302018-02-11T13:41:23+5:30
देशात आरोग्यासाठी उपचार सुविधांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे. स्वच्छ भारतसह आरोग्यदायी भारत होईल.
औरंगाबाद : देशात आरोग्यासाठी उपचार सुविधांबरोबर प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे. स्वच्छ भारतसह आरोग्यदायी भारत होईल. औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालय दूर पर्यंतच्या रुग्णांसाठी आधार ठरेल, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले.
मराठवाड्यासह लगतच्या भागातील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणाऱ्या शासकीय कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे. या राज्य कर्करोग संस्थेचे भूमिपूजन आणि भाभा ट्रॉन-२ युनिटचे उद्घाटन रविवारी (दि.११) केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती होती. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. सुभाष झांबड,आ. प्रशांत बंब, टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. कैलास शर्मा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे, सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर,डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती.
तोगडिया यांच्याविषयी बोलण्याचे टाळले
देशाचे आरोग्य अतिदक्षता विभागात दाखल आहे. सरकारी आरोग्य व्यवस्थेत पुरेसे डॉक्टर नाहीत, परिचारिका नाहीत. इमारत आहे तर यंत्रसामग्री नाही. यंत्र असेल तर ते चालू नाही. केंद्र सरकारने आरोग्य विमा देण्याची जाहीर केलेली योजना योग्य असली तरी त्यासाठी लागणारा विम्याचा हप्ता कोठून आणणार, असा प्रश्न विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया औरंगाबादेत म्हणाले होते. पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडिया यांनी केलेल्या वक्तव्याविषयी नड्डा यांनी बोलण्याचे टाळले.