सिल्लोडमध्ये सत्तार ‘सेना’ चे नवनिर्माण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:24 PM2019-09-03T13:24:56+5:302019-09-03T13:26:58+5:30
१९८४ पासून असलेला कॉंग्रेसचा हात सोडला
औरंगाबाद : कॉंग्रेससोबत ३५ वर्षांपासून असलेले सर्वधर्म-समभावाची नाळ तोडून अखेर आ.अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत सोमवारी प्रवेश करून नवीन राजकारणाचा ‘श्रीगणेशा’ केला. शिवसेनेला आ.सत्तार यांच्या रुपाने चेहरा मिळाला असून, भाजपसोबत युती तुटल्यास सत्तार हेच सेनेचे उमेदवार असतील. आता सत्तार ‘सेना’ चे नवनिर्माण सिल्लोडमध्ये होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे.
१९८४ साली सिल्लोड ग्रामपंचायत सदस्यापासून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. १९९४ साली नगराध्यक्ष सिल्लोड, २००१ साली ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. २००७ साली त्यांचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर २००९ साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली. २००९-१० साली त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
२०१४ साली काँग्रेसकडून उमेदवारी घेऊन ते पुन्हा विधानसभेवर निवडून आले. लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी देण्यावरून आ.सत्तार यांचे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत बिनसले. त्यामुळे त्यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस विरोधी भूमिका घेतली. दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपसोबत जाण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मे, जून, जुलै असे तीन महिने ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत राहिल्या. परंतु सिल्लोड भाजपचा त्यांना कडाडून विरोध झाला. त्यांच्या विरोधात सिल्लोड भाजप एकवटल्यामुळे त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन हाती बांधण्याचा निर्णय सोमवारी घेतला.
अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी मिळणार?
आ.सत्तार यांच्यावर शिवसेना अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मराठवाडा संपर्कप्रमुख अथवा प्रदेशप्रमुख अशा स्वरुपाचे एखादे पद सत्तार यांना येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणे शक्य आहे.
सिल्लोड मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/l8EkzuROZy
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 2, 2019
आ.सत्तार यांचा राजीनामा मंजूर
आ.सत्तार यांचा राजीनामा तातडीने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून मंजूर करून घेण्यात आला. गणोरी येथील एका कार्यक्रमात बागडे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.अंबादास दानवे यांनी गाठले. सोबत समीर सत्तारदेखील होते. आ.दानवे म्हणाले, आ.सत्तार यांचा राजीनामा बागडे यांच्याकडून मंजूर करून घेण्यात आला.
राजकारणात सर्व काही चालते
आ.सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशावर शिवसेना नेते माजी खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, राजकारणात सर्व काही चालते. शत्रू कधी मित्र होतात. तर मित्र कधी शत्रू होतात. पक्षाचा निर्णय आहे. ते आता शिवसेनेत आले आहेत. सगळ्यांना सांभाळून घेऊ.