प्लॉटचे पैसे घेऊन रजिस्ट्रीस नकार, प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ सुनील कसबेकरांची २३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 03:36 PM2021-12-25T15:36:02+5:302021-12-25T15:36:24+5:30
क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : प्लॉटचे पैसे देऊन रजिस्ट्री करण्यास नकार
औरंगाबाद : प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुनील रामचंद्र कसबेकर (वय ६०, रा. समर्थनगर) यांची जमीन खरेदी प्रकरणात २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींमध्ये पुष्पा जोशी आणि मृत श्रीकृष्ण जोशी यांचा समावेश आहे.
डाॅ. सुनील कसबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हर्सूल गट क्रमांक १७१/५ मध्ये असलेला प्लॉट विकायचा आहे, आम्हाला ओळखीतल्या व जवळच्या व्यक्तीला प्लॉट द्यायचा आहे, असे श्रीकृष्ण जोशी व त्यांची पत्नी पुष्पा जोशी यांनी डॉ. कसबेकर यांना सांगितले. घरोब्याचे संबंध असल्यामुळे कसबेकर यांनी विश्वास ठेवत त्यांचा ७२२ चौरस मीटरचा प्लॉट घेण्याचे ठरवले. या प्लॉटची किंमत २३ लाख रुपये ठरविण्यात आली. जोशींनी कसबेकर यांच्याकडून चार लाख रुपयांचा धनादेश घेऊन प्लॉटची बॉण्डवर इसार पावती करून दिली. त्यानंतर रजिस्ट्री करून द्या, असा आग्रह कसबेकर यांनी धरला.
तेव्हा मनपाचा विकास कर भरायचा आहे, हा कर भरून तुम्हाला रजिस्ट्री करून देतो, असे जोशींनी सांगितले. यानंतर पैशाची गरज सांगून त्यांनी कसबेकरांकडून वेळोवेळी १० लाख रोख आणि १३ लाख धनादेशाद्वारे घेतले. त्यानंतर जोशी यांनी डॉ. कसबेकरांना जागेचा ताबा दिला. हा संपूर्ण व्यवहार २००८ मध्ये संपला होता. तरीदेखील जोशी यांनी विविध कारणे सांगून रजिस्ट्री करून देण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, २०२० मध्ये श्रीकृष्ण जोशी यांचे निधन झाले. त्यानंतर २०२१ मध्ये डॉ. कसबेकर यांनी प्लॉटबाबत वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन दिले असता, पुष्पा जोशी यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्याबाबत कसबेकर यांनी विचारणा केली असता, पुष्पा जोशी यांनी टाळाटाळ केली, तसेच ओळख देण्यास नकार दिला.
जमीन विक्रीचा प्रयत्न
आपल्याला विकलेली जमीन जोशी यांनी विकण्यास काढली, ही बाब कळताच कसबेकरांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. प्राथमिक चौकशीत हा संपूर्ण व्यवहार समर्थनगर येथे कसबेकरांच्या राहत्या घरी झाला असल्याचे समोर आले. त्यानुसार क्रांती चौक पोलीस ठाण्यात शुक्रवारी पुष्पा जोशी व त्यांचे मयत पती श्रीकृष्ण जोशी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.