वीजचोरी करून बिल भरण्यास टाळाटाळ; १० जणांवर गुन्हा दाखल
By साहेबराव हिवराळे | Published: April 4, 2024 06:49 PM2024-04-04T18:49:02+5:302024-04-04T18:49:13+5:30
सहायक अभियंता संभाजी अथरगण यांच्या फिर्यादीवरून १० जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : वीजचोरी करून बिल भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर १० जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वीजचोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
परिसरात काही ग्राहक मीटरमध्ये फेरफार करून तसेच लघुदाब वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी करीत असल्याची माहिती महावितरणला मिळाली. यावरून शहागंज शाखेचे सहायक अभियंता संभाजी अथरगण, प्रधान तंत्रज्ञ डी.जे. शिंदे, एस.आर. पांदे, वरिष्ठ तंत्रज्ञ व्ही.पी. एरंडे यांनी १ ऑगस्ट २०२३ रोजी तपासणी मोहीम राबविली. त्यात रशीदपुरा येथील शिराउद्दिन शरिफोद्दिन याने ३५ हजार ८५ रुपयांची, अब्दुल सलीम अब्दुल हादी याने ११ हजार ३३० रुपयांची, मर्जिया बेगम याजाहज अली खान यांनी २९ हजार ५१० रुपयांची, फारुक अली मौजम अली याने १५ हजार ७०८ रुपयांची तर काचीवाड्यातील राजकुमार इंद्रचंद्रजी लोहाडे याने २८ हजार २०० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळले.
आणखी एका प्रकरणात शहागंज भाजी मंडईतील दुकानमालक शेख जाहेद, वापरकर्ते मोहंमद इब्राहीम मोहंमद साबेर, शेख शफिक अब्दुल हक, शेख जावेद शेख, शेख सत्तार नबी यांनी २० हजार ३१० रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. वीजचोरीचे निर्धारित बिल दिले असता ते भरण्यास त्यांनी टाळाटाळ केली. सहायक अभियंता संभाजी अथरगण यांच्या फिर्यादीवरून १० जणांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.