दबाव झुगारून समितीने केली विद्यापीठ कुलसचिवांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:20 PM2020-03-18T18:20:04+5:302020-03-18T18:26:50+5:30
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीचा निर्णय
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने बहुप्रतीक्षित तीन संवैधानिक पदे व चार अधिष्ठातांची निवड केली. कुलसचिवपदी डॉ. जयश्री सूर्यवंशी, विद्यापीठ उपपरिसर संचालकपदी डॉ. दत्तात्रय गायकवाड, तर परीक्षा मंडळ संचालकपदी डॉ. योगेश पाटील या तिघांची निवड करण्यात आली आहे. निवड करताना समितीने कोणत्याही गटातटाच्या हस्तक्षेपाला थारा दिला नाही, हे विशेष!
यासंदर्भात पत्रकार परिषदेत कुलगुरू डॉ. येवले यांनी सांगितले की, वेगवेगळ्या कारणांमुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कुलसचिव, परीक्षा मंडळ संचालक, उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपपरिसरासाठी संचालक तसेच वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, आंतरविद्याशाखा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा आणि मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखांच्या अधिष्ठांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि.७, १४ आणि १५ मार्च रोजी निवड समितीने घेतल्या. विद्यापीठ प्रशासनाने सदर प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरीतीने पार पाडली.
आस्थापना विभागाचे उपकुलसचिव दिलीप भरड व सहकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. आंतरविद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी ७ अर्ज आले होते. ५ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या पदासाठी शिवाजी विद्यापीठातील डॉ. चेतना सोनकांबळे यांची निवड झाली. वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्राच्या अधिष्ठातापदासाठी ५ अर्ज आले होते. या पदासाठी डॉ. वाल्मीक सरवदे यांची निवड झाली. मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विभागाच्या अधिष्ठातापदासाठी डॉ. प्रशांत अमृतकर यांची, तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी डॉ. भालचंद्र वायकर यांची निवड करण्यात आली. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमध्ये राज्यपालांचे सदस्य किशोर शितोळे, व्यवस्थापन परिषदेचे एक सदस्य, प्रकुलगुरू आदींचा समावेश होता.
तीनही पदांचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहणार
कुलसचिवपदासाठी प्राप्त ३९ अर्जदारांपैकी १८ जणांनी मुलाखत दिली. यामध्ये डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची निवड झाली. परीक्षा मंडळाच्या संचालकपदी लोणेरे येथील ‘बार्टी’चे परीक्षा नियंत्रक योगेश पाटील आणि उस्मानाबाद विद्यापीठ परिसराच्या संचालकपदी डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची निवड करण्यात आली. या तीनही संवैधानिक पदांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल, तर अधिष्ठातांचा कार्यकाळ विद्यमान कुलगुरूंचा कार्यकाळ अथवा किमान साडेतीन वर्षे राहील.