नातेवाइकांचा सांभाळण्यास नकार, रुग्ण म्हणतो, ‘मला आश्रमात सोडा...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:02 AM2021-09-03T04:02:56+5:302021-09-03T04:02:56+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : रक्ताचे नातेवाईकच जणू शत्रू म्हणून उभे ठाकल्याने ‘मला आश्रमात सोडा...’ असे म्हणण्याची वेळ घाटीत दाखल ...

Refusing to take care of relatives, the patient says, ‘Leave me in the ashram ...’ | नातेवाइकांचा सांभाळण्यास नकार, रुग्ण म्हणतो, ‘मला आश्रमात सोडा...’

नातेवाइकांचा सांभाळण्यास नकार, रुग्ण म्हणतो, ‘मला आश्रमात सोडा...’

googlenewsNext

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : रक्ताचे नातेवाईकच जणू शत्रू म्हणून उभे ठाकल्याने ‘मला आश्रमात सोडा...’ असे म्हणण्याची वेळ घाटीत दाखल एका ६५ वर्षीय वृद्धावर ओढावली. या वृद्धावरील उपचार पूर्ण झाले आहेत. मात्र, रुग्णाचा सांभाळ करण्यास नातेवाइकांनी नकार दिला आहे. त्यामुळे रुग्णाला घाटीतून सुटीही देता येत नाही. सध्यातरी डाॅक्टर, परिचारिका आणि समाजसेवा अधीक्षकच रुग्णाचा सांभाळ करीत आहेत.

हडकोतील रहिवासी नातेवाइकांकडे आपण इतके दिवस राहत होतो, असे ६५ वर्षीय वृद्धाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आपल्याला पत्नी, मुले नसल्याचे सांगताना त्यांना भावना अनावर होत होत्या. नातेवाईक जर नकार देत असतील तर मला आश्रमात सोडून द्या, अशीच विनंती ते वारंवार करीत आहेत. ओट्यावरून पडल्याने ५ ऑगस्ट रोजी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कमरेखाली मार लागला आहे. त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक १३ मध्ये उपचार करण्यात आले. उपचार पूर्ण झाले आहेत; पण सध्या त्यांना खाटेवरून उठणेही अवघड आहे. एक ते दोन महिने आराम केल्यास ते बरे होतील, असे डाॅक्टरांनी सांगितले. त्यांना घाटीत ज्यांनी दाखल केले, त्यांचा मोबाइल बंद आहे. याविषयी सिडको पोलिसांना माहिती देण्यात आली. नातेवाईक येत नसल्याने आता या ज्येष्ठाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले जात आहेत. म्हातारपणी जवळचे नातेवाईकही दूर जात असल्याचे पाहून वाॅर्डातील प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत आहे.

------

पुनर्वसनासाठी प्रयत्नशील

सदर रुग्णाच्या पुनर्वसनासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. सिडको पाेलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनीही नातेवाइकांशी संपर्क साधला; पण नातेवाईक सांभाळ करण्यास नकार देत आहे. नातेवाइकांनी रुग्णाला नाकारणे हे चुकीचे आहे.

- अनुसया घोगरे, समाजसेवा अधीक्षक, घाटी रुग्णालय

------

फोटो ओळ...

घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ज्येष्ठाची विचारपूस करताना समाजसेवा अधीक्षक.

Web Title: Refusing to take care of relatives, the patient says, ‘Leave me in the ashram ...’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.