रोजंदारी मजदूर सेनेच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:58 AM2017-07-18T00:58:00+5:302017-07-18T01:00:20+5:30
बीड : बीड, परळी व माजलगाव नगर पालिकेतील सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड, परळी व माजलगाव नगर पालिकेतील सफाई कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. तब्बल ३१ दिवस उलटूनही प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रवेशद्वारावर घोषणा देताना एका आंदोलकाचा रक्तदाब वाढल्याने चक्कर आली. त्यामुळे सर्वांचीच धावपळ झाली. जिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर ते शुद्धीवर आले आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
सफाई कामगारांना समान काम समान वेतन देऊन थेट नियुक्ती देण्यात यावी, बीड न.प.घंटागाडी सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्याने त्यांच्या बंद दिवसाच्या वेतनासह पूर्ववत कामावर रूजू करून घेण्यात यावे, बीड न.प. पाणी पुरवठा कामगारांचे पाच महिन्यांचे थकित वेतन देण्यात यावे, परळी न.प.तील कंत्राटी सफाई कामगारांच्या विश्रांतीच्या दिवसाचे परिश्रमिक देण्यात यावे, अतिकालिक दराचे वेतन देऊन बोनस द्यावा, नागनाथ एंटरप्रायझेसची आर्थिक क्षमता नसताना कामाचा आदेश दिला, याची चौकशी करावी, सर्व कामगारांना नुकसानभरपाई देऊन त्यांची थेट नियुक्ती करावी, माजलगावातील सफाई कामगारांची १२ टक्के व न.प.चे १२ टक्के असा भविष्य निर्वाह निधी कपात करून त्यांच्या नावे जमा केला आहे. याची चौकशी करून प्रत्येक कामगाराच्या नावे भविष्य निर्वाह निधीची किती रक्कम जमा केली, याची माहिती द्यावी, यासारख्या विविध मागण्यांसाठी १५ जूनपासून रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. तब्बल ३१ दिवस उलटूनही याची प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही.
सोमवारी नगर परिषदेपासून या कामगारांचा निघालेला मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे निवेदन दिल्यानंतर आक्रमक कामगारांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये सफाई कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. येथेच एका आंदोलकाला चक्कर आली.