ऐन दिवाळीत आयुर्वेदिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 10:47 PM2018-11-03T22:47:08+5:302018-11-03T22:48:10+5:30
केंद्रीय आयुष मंत्रालयाने बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंगसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे पर्सेंटाईल तब्बल १५ टक्क्यांनी घटवले आहे. यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान नव्याने नोंदणी करता येणार आहे.
औरंगाबाद : केंद्रीय आयुष मंत्रालयाने बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीएस्सी नर्सिंगसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीचे पर्सेंटाईल तब्बल १५ टक्क्यांनी घटवले आहे. यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान नव्याने नोंदणी करता येणार आहे.
आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा यावर्षी फज्जा उडाला आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशसाठीचे पर्सेंटाईल खुल्या गटासाठी ५० टक्के आणि आरक्षित गटासाठी ४० टक्के ठेवण्यात आले होते. यास राजस्थान, उत्तराखंड, कर्नाटक, पंजाब, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. पर्सेंटाईल जास्त असल्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून मुकणार असल्याचा युक्तिवादही करण्यात आला होता. काही राज्यांत हे पर्सेंटाईल न्यायालयाने घटवले. यामुळे केंद्रीय आयुष मंत्रालयाने निर्णय घेत हे पर्सेंटाईल तब्बल १५ टक्क्यांनी घटवण्याचा निर्णय घेतला. यामुळे नीटला खुल्या गटात ८६ आणि आरक्षित गटात ६७ गुण घेतलेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. नव्याने पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नोंदणी करण्यास राज्य सीईटी सेलने ३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान मुदत दिली आहे. या मुदतीत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. यानंतर ६ रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान यात नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येईल. यानंतर ११ रोजी रिक्त राहिलेल्या जागांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर पुन्हा एका प्रवेश फेरी राबविण्यात येईल. ही फेरी १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे. ही सगळी प्रवेश प्रक्रिया ऐन दिवाळीत होणार असल्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
कोट
प्रवेशासाठीचे पर्सेंटाईल खुल्या गटासाठी ५० वरून ३५ वर आणले. आरक्षित गटासाठी हीच टक्केवारी ४० वरून २५ केली. हे सगळे अनाकलनीय आहे. यात व्यवस्थापन कोट्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. याचवेळी नव्याने काही विद्यार्थ्यांना प्रवेशही मिळणार आहेत.
-सावन चुडीवाल, अभ्यासक, प्रवेश प्रक्रिया