तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या ७८८ रजिस्ट्रींची नोंद बेकायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 06:40 PM2024-11-28T18:40:52+5:302024-11-28T18:41:23+5:30
चौकशी अहवालात ठपका; वर्षभरात ३० हजार खरेदी-विक्रीचे व्यवहार
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मुद्रांक नोंदणी विभागाने गेल्या वर्षभरातील केलेल्या रजिस्ट्रींची चौकशी करून सादर केलेल्या अहवालात शहरातील तीन कार्यालयांत एकूण ७८८ रजिस्ट्रींमध्ये तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
जिल्हा मुद्रांक अधिकारी विवेक गांगुर्डे यांनी सुधारित अहवाल चौकशी समितीकडे दिला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या पुराव्यासह तक्रारी आल्यानंतर त्यांनी अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली. समितीने सप्टेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या वर्षभरातील दस्तांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नोंदणी विभागाने दीड महिन्यानंतर चौकशीचा अहवाल सादर केला. वर्षभरात ३० हजार दस्तांची नोंदणी झाली असून, त्यात केवळ ५०० रजिस्ट्री झाल्याचे सांगण्यात आले होते. तो अहवाल फेटाळून सुधारित अहवाल सादर करण्याचे आदेश समितीने दिले. त्यानुसार नोंदणी विभागाने सोमवारी सुधारित अहवाल सादर केला. त्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ मध्ये ३४४, दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ५ मध्ये २५५ तर दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ मध्ये १९९ रजिस्ट्रींची नोंदणी तुकडाबंदीचे उल्लंघन करून झाल्याचे म्हटले आहे.
एनएच्या चौकशीचाही विचार
नोंदणी विभागात काही ठिकाणी बनावट एनएद्वारे अनेक रजिस्ट्रींची नोंदणी झाल्याची चर्चा आहे. यावर माजी विभागीय आयुक्तांनी देखील नगररचना संचालकांना पत्रव्यवहार केला होता. केवळ एनए जोडल्याने काही ठिकाणच्या व्यवहारांना चौकशीतून वगळले आहे. त्यामुळे बेकायदेशीर रजिस्ट्री नोंदणीचा आकडा कमी असल्याचे बोलले जात आहे. ज्या रजिस्ट्री ६०० चौ. मीटरपेक्षा कमी आहे, अशा सर्वच दस्तांसोबत जोडलेल्या एनएचीही तपासणीचा विचार प्रशासन करीत आहे. कुठल्याही प्राधिकरणाचे मंजूर रेखांकन (लेआऊट) नसलेल्या रजिस्ट्री बेकायदेशीर असण्याची शक्यता आहे.