बनावट आधार कार्डाधारे रजिस्ट्री, मुद्रांक कार्यालयाने झटकले हात; पाचजणांवर गुन्हा

By विकास राऊत | Published: July 26, 2024 04:53 PM2024-07-26T16:53:42+5:302024-07-26T16:54:48+5:30

सत्यता पडताळणीची जबाबदारी विभागाची नाही

Registry with fake Aadhaar card; Crime against five people | बनावट आधार कार्डाधारे रजिस्ट्री, मुद्रांक कार्यालयाने झटकले हात; पाचजणांवर गुन्हा

बनावट आधार कार्डाधारे रजिस्ट्री, मुद्रांक कार्यालयाने झटकले हात; पाचजणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास येथील मुद्रांक नोंदणी कार्यालयात चिकलठाण्यातील लाखो रुपये किमतीच्या एका भूखंडाची मार्चमध्ये रजिस्ट्री झाली. त्याच भूखंडाची बनावट आधार कार्डच्या आधारे दुसरी रजिस्ट्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ मध्ये मे महिन्यातही झाली. हा खळबळजनक प्रकार ‘लोकमत’ने २२ जुलै रोजी वृत्त मालिकेतून उघडकीस आणला. या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीअंती मुद्रांक विभागाने २५ जुलै रोजी पाचजणांविरोधात सिटीचौक पाेलिसांत तक्रार केली आहे. त्यावरून पोलिसांनी पाचजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दुय्यम निबंधक बालाजी मादसवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून सौरभ सकलेचा (भूखंडाचा बनावट मालक), भूखंड घेणारे शे.एजाज अहमद अब्दुल रशीद, रा. मोंढा नाका, युसूफ खान अयुब खान, रा. रहीमनगर, शे. हुजैफा अहेमद शे.एजाज अहदम, रा. मोंढानाका, राजपूत, रा. जवाहर कॉलनी या पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. बोगस आधार कार्ड, भूखंडाचा बोगस मालक उभा करून मुद्रांक विभागात रजिस्ट्री होत असेल तर सामान्य नागरिकांना आता मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना बारकाईने काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणात मुद्रांक विभागाने तक्रारी, कागदपत्रांची सत्यता पडताळणीचे अधिकार नसल्याचे सांगून हात झटकले आहेत. सगळ्यांना फसविणाऱ्या बनावट मालकाचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. प्रकरणाचा पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती गायके हे तपास करणार आहेत.

भूखंडाचे खरे मालक असलेल्या सौरभ सकलेचा यांनी जिल्हाधिकारी, पोलिसांकडे धाव घेतली. बनावट आधार कार्ड, बनावट फोटो, स्वाक्षरी बनावट, सगळी कागदपत्रे बोगस दाखवून एकाच मालमत्तेची सहदुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक १ येथे नोंदणी केल्याची तक्रार त्यांनी केली होती. खोटे आधार कार्ड, बनावट पॅनकार्डचा वापर करून खरेदी-विक्रीची नोंदणी मुद्रांक विभागाने प्रमाणित केलीच कशी, कमी मुद्रांक शुल्क घेऊन मालमत्ता विक्रीचा व्यवहार पूर्ण कसा काय केला? हे सगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते.

नेमके प्रकरण काय होते?
चिकलठाण्यातील गट नं. ३६८ मधील ९ हजार ३७२ चौ. फूट भूखंडाची विक्री मार्चमध्ये जालन्यातील मूळ मालकाने करून दुय्यम निबंधक कार्यालय क्र. ३ मध्ये रजिस्ट्री करून दिली. रजिस्ट्रीनंतर सातबाऱ्यावर नाव घेण्यासाठी चिकलठाणा तलाठी सजा येथे अर्ज केला. परंतु, मूळ मालकाच्या नावे दुसरी रजिस्ट्री क्रमांक ३५००/२०२४ ही ३१ मे रोजी झाली असून, सातबाऱ्यावर पहिल्या व्यवहारातील नाव घेऊ नये, असा अर्ज आल्याचे समोर आले. मूळ मालकाने स्वत: विकलेल्या मालमत्तेची अडीच महिन्यांनंतर ३० लाख रुपयांत विक्रीची रजिस्ट्री केली. बनावट रजिस्ट्री झाली असून याप्रकरणी सुनावणी ठेवली असता खरे मालक सौरभ सकलेचा यांनी सर्व कागदपत्र सादर केली. त्यांचे नाव वापरून, बनावट ओळखपत्र तयार करून अन्य कुणीतरी भूखंड विक्रीची रजिस्ट्री करून दिली, असे मादसवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कागदपत्रांची सत्यता पडताळणीचे अधिकार नाही
नोंदणी अधिनियम १९०८, महाराष्ट्र नोंदणी नियमानुसार व न्यायालयाच्या आजवरच्या निर्णयानुसार दुय्यम निबंधकांना दस्तावेजातील मिळकतीचे मालक व मालकी हक्काची चौकशी व त्यासोबत जोडलेल्या पुराव्यांची वैधता तपासण्याचे अधिकार नाहीत. मात्र, नोंदणी करताना खोटे कागदपत्र, बनावट व्यक्ती आढळून आल्यास फौजदारीचे अधिकार आहेत, असे पाेलिसांत तक्रारीत स्पष्ट केले आहे. चिकलठाण्यातील गट नं. ३६८ मधील ९ हजार ३७२ चौ. फूट भूखंडाची रजिस्ट्री होताना मूळ मालक बोगस आहे की नाही, साक्षीदार कोण आहेत, आधार कार्ड लिंक झाले नसताना रजिस्ट्री कशी केली हे प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

Web Title: Registry with fake Aadhaar card; Crime against five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.