शेतकरी कुटुंबांसाठी पुन्हा उभारी उपक्रम राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:05 AM2021-05-21T04:05:27+5:302021-05-21T04:05:27+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांचे '' उभारी २.०'' या उपक्रमातंर्गत सर्वेक्षण ...
औरंगाबाद : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी त्यांचे '' उभारी २.०'' या उपक्रमातंर्गत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. २०१८ साली मराठवाड्यात हा उपक्रम राबविण्यात आला होता.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, त्यांच्या भविष्यातील नियोजनासाठी जिल्ह्यातील २०१५ ते २०२० या कालावधीतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण करुन परिपूर्ण अहवाल सादर करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी गुरूवारी सर्व तहसीलदार व नायब तहसीलदारांना ऑनलाईन बैठकीत दिल्या. जाधवर यांनी त्यांच्या दालनातून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व नायब तहसीलदारांशी संवाद साधला.
मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासनाच्या विविध विभागांच्या कोणत्या योजनांचा लाभ देता येईल, याची निश्चिती सर्वेक्षणात करण्यात येईल. त्यानंतर कुटुंबनिहाय तपशील जिल्हाधिकारी कार्यालयास मिळाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.
मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्या कुटुंबांच्या गरजा, त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. सर्वेक्षणाचा अहवाल शासनास सादर करुन कार्यात्मक शिफारशी करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात पाच वर्षांत ८४० आत्महत्या
औरंगाबाद -७७
फुलंब्री - १००
पैठण - १५५
सिल्लोड - १५४
सोयगाव - ६४
कन्नड - ११३
खुलताबाद - ४२
वैजापूर - ६८
गंगापूर - ६७
एकूण - ८४०