घाटी रुग्णालयात नातेवाईक बनताहेत ‘स्टँड’; रुग्णांबरोबर नातेवाईकही सहन करतात वेदना

By संतोष हिरेमठ | Published: September 8, 2023 12:54 PM2023-09-08T12:54:07+5:302023-09-08T12:55:19+5:30

हातात सलाईन घेऊन उभ्या राहिलेल्या घाटी रुग्णालयातील लहान मुलीचा फोटो मे २०१८ मध्ये समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले होते.

Relatives become 'stands' at Ghati Hospital; Along with the patients, the relatives also bear the pain | घाटी रुग्णालयात नातेवाईक बनताहेत ‘स्टँड’; रुग्णांबरोबर नातेवाईकही सहन करतात वेदना

घाटी रुग्णालयात नातेवाईक बनताहेत ‘स्टँड’; रुग्णांबरोबर नातेवाईकही सहन करतात वेदना

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड घाटी रुग्णालयात पाच वर्षांनंतर अजूनही वेळोवेळी नातेवाइकांनाच सलाइन स्टँड बनावे लागत असल्याची परिस्थिती आहे. खाटा जास्त अन् सलाइन स्टँड कमी, अशीच अवस्था आहे. त्यामुळे सलाइनची गरज असलेल्या रुग्णासाठी स्टँडची शोधाशोध करावी लागते आणि तोपर्यंत नातेवाइकांनाच सलाइनची बाटली हातात धरून उभे रहावे लागते.

हातात सलाईन घेऊन उभ्या राहिलेल्या घाटी रुग्णालयातील लहान मुलीचा फोटो मे २०१८ मध्ये समोर आला आणि राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले होते. या प्रकाराविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या, सलाइन स्टँड वाढविण्यावर भर देण्यात आला. मात्र, पाच वर्षांनंतरही घाटीतील रुग्णांच्या नातेवाइकांनी हातात सलाइनची बाटली धरण्याची परिस्थिती बदलली नाही. नातेवाइकांनी हातात सलाइन धरलेले चित्र वॉर्डावॉर्डांमध्ये पहायला मिळते.

किमान दहा मिनिटे तरी पकडा
सलाइन स्टँड मिळेपर्यंत रुग्णांच्या नातेवाइकांना किमान ५ ते १० मिनिटे सलाइनची बाटली हातात धरून उभे रहावे लागते. घाटीतील काही वॉर्डांत पाहणी केल्यावर ही परिस्थिती पहायला मिळाली. काही खाटांजवळ सलाइन स्टँडच नाही. त्यामुळे एखादा रुग्ण आला; तर स्टँडची शोधाशोधच करावी लागते.

सलाइन स्टँड किती अन् कुठे?
घाटीत २०१८ मध्ये ८३२ सलाइन स्टँड होते. त्यानंतर स्टँडच्या संख्येत वाढ झाली. परंतु आता नेमके किती स्टँड आहेत, याची संख्या कुणाकडेच नाही. एकीकडे सलाइन स्टँड मिळत नसल्याची परिस्थिती आहे, तर दुसरीकडे काही स्टँड अडगळीत पडून असल्याचेही पहायला मिळाले.

अशी का आहे परिस्थिती?
घाटी रुग्णालयात १,१७७ खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक रुग्ण दाखल होतात. मंजूर खाटांव्यतिरिक्त जवळपास ६०० खाटा अधिक आहेत. एकट्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात ९० खाटा मंजूर असताना अडीचशे ते तीनशे महिला भरती असतात. अतिरिक्त रुग्णसंख्येमुळे सोयीसुविधा अपुऱ्या पडत आहे. त्याकडे शासनाचे लक्ष जात नसल्याची परिस्थिती आहे.

बेड जास्त, स्टँड पुरेशा प्रमाणात
घाटीत मंजूर बेडपेक्षा अधिक बेडवर रुग्णसेवा दिली जाते आहे. प्रत्येक बेडवरील रुग्णाला सलाइन लावावी लागते असे नाही. त्यामुळे रुग्णालयात भरपूर सलाइन स्टँड आहेत. एका स्टँडवर दोन सलाईन बाटली लावता येतात.
- डाॅ. विजय कल्याणकर, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

Web Title: Relatives become 'stands' at Ghati Hospital; Along with the patients, the relatives also bear the pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.