घाटी रुग्णालयात नातेवाइकांना बनावे लागते कर्मचारी; ४० टक्के पदे रिक्त, रोज २ हजार रुग्ण
By संतोष हिरेमठ | Published: October 16, 2023 04:02 PM2023-10-16T16:02:11+5:302023-10-16T16:02:41+5:30
वर्षानुवर्षे ही पदे भरली जात नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा भार वाढतच आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात तब्बल डाॅक्टर, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल ४० टक्के पदे रिक्त आहेत. तेराशे कर्मचाऱ्यांवर रोज २ हजार रुग्णांचा भार आहे. वर्षानुवर्षे ही पदे भरण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. परिणामी, नातेवाइकांनाच कर्मचारी बनून रुग्णांची कामे करावी लागतात.
घाटीत १,१७७ खाटा मंजूर आहेत. प्रत्यक्षात दररोज १,८०० ते २ हजार रुग्ण भरती असतात. मंजूर असलेल्या २,२०७ पैकी १,३१० पदे भरलेली आहेत. तब्बल ८९७ पदे रिक्त आहेत. यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशी डाॅक्टरांची ८८ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचीही पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. वर्षानुवर्षे ही पदे भरली जात नसल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा भार वाढतच आहे. परिणामी, स्ट्रेचर ढकलण्यापासून अनेक कामे नातेवाइकांना करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. घाटी रुग्णालयात ५५० निवासी डाॅक्टर कार्यरत आहेत.
जागा तत्काळ भरा
घाटी रुग्णालयातील रिक्त जागा या तत्काळ भरल्या गेल्या पाहिजेत. सरकारी रुग्णालयाकडे गोरगरीब जनता आशेने पाहत असते.
- प्रवीण शिंदे, अभ्यागत समिती सदस्य
नोकर भरती करा
घाटीत लवकरात लवकर नोकर भरती झाली पाहिजे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा भार अधिक आहे.
- ॲड. इकबालसिंग गिल, अभ्यागत समिती सदस्य
घाटी रुग्णालयातील मनुष्यबळाची स्थिती
संवर्ग---मंजूर- भरलेली पदे- रिक्त पदे
वर्ग-१ --२८-१६-१२
वर्ग-२ --१०४-८४-२०
वर्ग-३ --१८३-१२७-५६
परिचर्या संवर्ग -- ८८९-६५५-२३४
परिचर्या विद्यार्थिनी (विद्यावेतन)-२५९-०-२५९
वर्ग-४ --७४४-४२८-३१६
एकूण २२०७--१३१०-८९७